सातारा येथे पोलीस ठाण्याच्या बिनतारी संदेशवाहक मनोर्‍यावर चढून युवकाचे आंदोलन

पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने युवक उद्विग्न

सातारा, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – शेतातील पिकाची चोरी होत असल्याविषयी पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने भुरकवडी (जिल्हा सातारा) येथील युवकाने पोलीस ठाण्याच्या बिनतारी संदेशवाहक मनोर्‍यावर चढून आंदोलन केले. (तक्रारीची नोंदही न घेणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक) पोलीस उपअधीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर युवकाने आंदोलन मागे घेतले. सागरेश्‍वर हनुमंत बनसोडे असे युवकाचे नाव आहे.

याविषयी हनुमंत आनंद बनसोडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार बनसोडे पिता-पुत्र न्यायालयाच्या आदेशानुसार शेतजमिनीची वहिवाट करत आहेत; परंतु त्यांच्या शेतात उगवलेली पिके चोरीस जात आहेत. याविषयी त्यांनी तक्रार प्रविष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. यामुळे अन्याय होत असल्याच्या भावनेतून त्यांनी वरील प्रकार केला. जिल्हा पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी भेट घेऊन तक्रार नोंदवून घेतली.