वर्धा येथे पोलाद प्रकल्पात स्फोट होऊन २८ कामगार आणि ३ अभियंते भाजले !

वर्धा – जिल्ह्यातील भुगाव येथील उत्तम गालवा या पोलाद प्रकल्पात ३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता अचानक स्फोट झाल्याने २८ कामगार आणि ३ अभियंते भाजले आहेत. हा प्रकल्प सध्या १२ फेब्रुवारीपर्यंत बंद आहे. प्रकल्पात दुरुस्तीची कामे चालू आहेत. कारखान्यातील ‘ब्लास्ट फर्निश’चा स्फोट झाल्याने त्यातून निघालेल्या गरम वाफेमुळे ३ अभियंते आणि २८ कामगार भाजले गेले आहेत. या सर्वांना सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. बहुतांश घायाळ झालेले २० टक्क्यांच्या आत भाजले आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. उदय मेघे यांनी दिली. या प्रकरणी सावंगी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय यांच्या वतीने कारखाने अधिनियम १९४८ च्या तरतुदीनुसार, तसेच सरकारी कामगार अधिकार्‍यांच्या वतीने वेतन प्रदान नियम आणि कामगार विमा नियमाच्या अनुषंगाने, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पडताळणी करून अपघातास उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. ही घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. या प्रकरणाची चौकशी कामगार अधिकार्‍याद्वारे केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.