११.३.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांच्या समवेत आलेल्या सांगली येथील भजनी मंडळातील महिलांचे भजन झाले. त्यांना आलेले अनुभव येथे दिले आहोत.
१. श्रीमती सुनिता शा. हेर्लेकर
अ. गोव्यातील सनातनच्या आश्रमात आम्ही भगिनी भजन म्हणत असतांना मला थोडा ताण होता. ‘भजन कसे होईल ? वयामुळे चढ-उतार करायला जमेल का ?’, असे मला वाटत होते; परंतु इथे आल्यापासून मी भारावून गेले होते.
आ. आश्रमात काही ठिकाणी ‘ॐ’ उमटलेले दिसले आणि भिंतीला हात लावून उभी होते, तर ‘हातातून स्पंदने येत आहेत’, असे जाणवले.
इ. मला अध्यात्माची थोडी आवड आहे. सनातन संस्थेविषयी बरेच बरे-वाईट ऐकले होते; परंतु इथे आल्यावर तसे अजिबात जाणवले नाही आणि अपप्रचार करणार्या लोकांचा पुष्कळ राग आला. आश्रमात आम्ही स्वर्गसुख अनुभवत होतो.
ई. ‘मला माझ्या जीवनाचा ऊर्जास्रोत (बॅटरी) १०० टक्के भारित (चार्ज) झाला आहे’, असे वाटले. हा ऊर्जास्रोत जास्त काळ टिकण्यासाठी ‘या वयात प्रपंचात गुंतण्यापेक्षा असे काहीतरी कार्य करावे’, असे वाटते.’
२. सौ. पल्लवी प्रफुल्ल जोगळेकर
अ. ‘येथील साधकांचे मृदु आवाजात बोलणे मनाला भावले आणि येथे पुष्कळच शांतता जाणवली.
आ. येथील नियमावली सर्व साधक व्यवस्थित पाळतात. ‘ते पाहून आपणही आपल्यात सुधारणा करायला हवी’, असे वाटले.
इ. या वास्तूत प्रवेश केल्यावर घराची, मुला-बाळांची किंवा दुखण्या-खुपण्याची कशाचीच आठवण झाली नाही.
ई. येथे आल्यावर ‘अखंड नामस्मरण आणि सेवा यांत रमावे’, असे वाटत होते.
उ. ‘आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळावी’, अशी अपेक्षा करते.’
३. सौ. कल्पना मनोज सहस्रबुद्धे (चित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची बहीण आणि सतारवादक श्री. मनोज सहस्रबुद्धे यांच्या पत्नी)
अ. ‘आम्ही भजन सेवेसाठी व्यासपिठावर बसल्यावर आमची सेवा करणार्या साधिका अत्यंत तळमळीने आमची काळजी घेत होत्या.
आ. भजनसेवा करतांना माझ्या पायात गोळा आला. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली आणि आरतीताईने (होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी) नामजपादी उपाय करण्यास सांगितले.
इ. आमची भजनसेवा चालू असतांना ‘समोर परात्पर गुरु डॉक्टर बसले आहेत’, असे जाणवले.
‘हे गुरुदेवा, आमची भजनसेवा भावपूर्ण करून घ्या आणि आम्हाला पुन्हा भजनसेवा करण्याची संधी द्या, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
४. श्रीमती रेखा रविंद्र काळे
अ. ‘माझ्या मनात आश्रमाविषयीची वेगळीच संकल्पना होती; परंतु आश्रमात पाऊल टाकले आणि वेगळेच चित्र समोर दिसले.
आ. आश्रमात सर्वत्र शांतता, सात्त्विकता आणि पावित्र्य जाणवत होते.
इ. आम्ही संध्याकाळी आश्रम पहाण्यापूर्वी मनात आश्रम म्हणजे एक वेगळीच संज्ञा होती. त्यापेक्षा इथे वेगळे होते. येथे विज्ञानाच्या साहाय्याने आधुनिकताही जाणवत होती आणि जिथे आवश्यक आहे, तिथे यंत्रांचाही वापर केलेला होता.
ई. आश्रम बघतांना ध्यानमंदिरात ध्यानाला बसले. तेव्हा नामजप करतांना माझ्या डोक्यात जी स्पंदने निर्माण झाली, ती यापूर्वी मी कधीच अनुभवली नव्हती.
उ. मला इथे माणसा-माणसांमधील प्रेम आणि आत्मीयता कळली. माझ्या मनाला इथे जी शांतता आणि समाधान अनुभवायला मिळाले, ते अवर्णनीय होते.’
५. सौ. सुनीती मोहन हुन्नुर
अ. ‘या आश्रमात रहाण्यासाठी वयाची अट नाही, हे मनाला भावणारे आहे.
आ. येथील साधकांच्या तोंडवळ्यावरील तेजस्वी भाव त्यांच्या आध्यात्मिक पातळीची कल्पना देतात. येथे प्रत्येक क्षणी शिस्त, स्वच्छता, हळुवारपणा आणि प्रामाणिकपणा जाणवतो. येथे सर्वांसमोर चुका सांगून प्रायश्चित्त घेण्याची मनाची प्रगल्भता जाणवते.
इ. येथे दुसर्याची सेवा करतांना ‘देवाची सेवा करत आहे’, असा भाव ठेवून करतात. हा भाव घरात अनुभवायला मिळणे कठीण आहे.
ई. जगात हिंदु धर्मच श्रेष्ठ आहे. त्यासाठी सामान्यजनांना येथील मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
उ. हे कार्य निश्चितच महान आहे. फणसाच्या बाहेर काटे असतात, तसे ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण ।’, हे या आश्रमालाही अपवाद नाही.
ऊ. इथे नास्तिक व्यक्ती आस्तिक होऊ शकते.
हे कार्य अधिकाधिक विस्तारित व्हावे आणि हिंदु राष्ट्र यावे, ही इच्छा अन् प्रार्थना करते.’
६. सौ. वैशाली प्रमोद फडणीस, सातारा
‘गुरुदेवा, आपल्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर आम्हाला आमच्या संसाराचीच काय; पण व्याधींचीही आठवण झाली नाही. आम्ही येथील पवित्र वातावरणात पूर्णपणे रममाण झालो. येथील साधक अतिशय लीन आणि सेवाभावी आहेत, हे येथील सद्विचारांचे प्रतीक आहे. आम्ही आमचे महद्भाग्य समजतो की, आम्हाला इथे यायची प्रेरणा मिळाली. आम्हाला इथल्या भिंतीतही चेतना जाणवली, मग सजीव सचेतन होतील, यात नवल ते काय ? आम्ही आपल्या चरणी सदैव लीन आहोत.’
७. सौ. अंजली मालतेश कुलकर्णी
अ. ‘आम्ही आश्रमात प्रवेश केल्यावर पाय धुतले आणि आत शिरल्यापासून येथील सात्त्विक स्पंदने जाणवू लागली.
आ. मी माझ्या दैनंदिन जीवनात सर्व गोष्टींचे कटाक्षाने पालन करीन. भोजनगृहातील चुकांचा फलक, ‘हा स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचा योग्य मार्ग आहे’, असे वाटले.
इ. स्वतःची चूक मान्य केल्यामुळे अहं नष्ट होतो आणि साधनेतील भक्तीमार्गाला योग्य दिशा मिळते.
ई. मी विज्ञानाची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे मला संगणकीय सेवा करणारे सर्व साधक आपापल्या सेवा अतिशय एकाग्रतेने करतांना पाहून पुष्कळ बरे वाटले. ‘विज्ञानातून अध्यात्म’ ही मोठी गोष्ट आहे.
उ. मी सतार वाजवते, तरी विज्ञानानंतर ‘संगीत साधना’ हे माझे ध्येय झाले आहे. मला सनातन धर्मातील सर्व विचार पटले आहेत; म्हणून मी विरोध करणार्यांना निक्षून सांगणार आहे.
ऊ. मला या आश्रमात सतार वाजवण्याची संधी मिळावी, अशी इच्छा आहे.
मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’ (१३.३.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |