सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे यांच्याप्रती साधकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

पृथ्वीवर येण्या रामराज्य हे ।
पूजनीय पृथ्वीराज झटती गुर्वाज्ञेने ॥

पू. पृथ्वीराज हजारे

पौष कृष्ण पक्ष तृतीया (३१.१.२०२१) या दिवशी सनातन प्रभातचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेली काव्यरूपी कृतज्ञता पुढे दिली आहे.

पू. पृथ्वीराज हजारे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पृथ्वीवर येण्या रामराज्य हे ।
पूजनीय पृथ्वीराज (टीप १) झटती गुर्वाज्ञेने ।
हजारो वर्षे टिकण्या राज्य ते ।
पू. काका करती प्रयत्न पराकाष्ठेचे ॥ १ ॥

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा ।
संकल्प केला परात्पर गुरुदेवांनी ।
त्या संकल्पाच्या पूर्तीचा ।
रात्रंदिन ध्यास घेतला पू. काकांनी ॥ २ ॥

भूमातेला लाभला सुपुत्र असा ।
आजच्या शुभदिनी ।
सनातनचा इतिहास घेई नोंद ।
ज्यांची प्रत्येक पानी ।
आम्हामध्ये यावे आपल्यातील ।
आज्ञापालन, त्याग अन् समर्पण वृत्ती ।
प्रार्थना करती साधक आज ।
पू. काकांच्या अन् श्री गुरूंच्या चरणी ॥ ३ ॥

टीप १ – पू. पृथ्वीराज हजारे
– सर्व साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०२०)

पू. पृथ्वीराज हजारे म्हणजे सनातन संत मांदियाळीतील २५ वे संतरत्न ।

कोणी म्हणती पू. भाई, तर कोणी म्हणती पू. काका प्रेमाने ।
गुरुदेवांच्या सनातन संत मांदियाळीतील
२५ वे संतरत्न असती ते क्रमाने ॥ १ ॥

असला व्याप जरी सेवेचा अनंत ।
आनंदे करती ते प्रत्येकाचे स्वागत ॥ २ ॥

लहान-थोर सर्व येती त्यांच्यापाशी नित्य ।
आधार वाटे सर्वांना त्यांचा, हे असे त्रिवार सत्य ॥ ३ ॥

नीटनेटकेपणाचे उत्तम उदाहरण ।
शिकण्यासारखे असती, त्यांच्यापाशी अनेक गुण ॥ ४ ॥

ध्येय असे विश्‍वविद्यालय उभारण्याचे ।
माहेरघर ते चौसष्ट कलांचे ॥ ५ ॥

दिनरात तळमळीने करती ते यत्न ।
साकार करण्या गुरुदेवांचे ईश्‍वरी राज्याचे स्वप्न ॥ ६ ॥
काय वर्णू गुरुदेवांची महती ।

दिली त्याने आम्हा अशी विभूती ॥ ७ ॥
​आजच्या या शुभदिनी पू. हजारेभाईंच्या चरणी वास्तूनिमिर्र्ती सेवेशी संबंधित साधकांकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार आणि भावपूर्ण प्रार्थना !

– वास्तूनिमिर्र्ती सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२०)

वाढदिवसानिमित्त साधकांनी कृतज्ञतापत्र दिल्यावर पू. पृथ्वीराज हजारे यांनी पत्ररूपाने व्यक्त केलेले मनोगत !

श्री. भूषणदादा,

​नमस्कार. आज आपण सर्व साधकांनी माझा वाढदिवस साजरा केला. शुभेच्छापत्र वाचून दाखवले. एखाद्या सामान्य व्यक्तीची स्तुती कशी करायची ?, याचे मला दिलेले शुभेच्छापत्र हे एक चांगले उदाहरण आहे.

​माझ्या या साधनेच्या प्रवासात गुरुकार्यातील खारीचा वाटा उचलण्याचा माझा हा अल्प प्रयत्न आहे. शुभेच्छापत्र वाचणार्‍यांना आणि ऐकणार्‍यांना वाटले असेल की, या कार्यात माझा सिंहाचा वाटा आहे. छोट्याशा खारीला सिंह म्हणून दाखवण्याचे शब्दकौशल्य (ज्याने कुणी लिहिले असेल, त्याचे) वाखाणण्यासारखे आहे.

शुभेच्छापत्र वाचून झाल्यानंतर पुढील विचार मनात आले, परात्पर गुरु आणि सद्गुरु यांच्यामध्ये एक अंतर (आध्यात्मिक) आहे. हे अंतर असणे साहजिक आहे. आपले सद्गुरु आणि साधक यांच्यामध्ये एक मोठे अंतर (आध्यात्मिक) आहे. सर्व साधकांनी हे अंतर अल्प करण्याचा (साधना चांगली करण्याचा) यशस्वी प्रयत्न केल्यास ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेतील अंतर शीघ्र गतीने अल्प होईल आणि परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना होईल, असे वाटते.

– गुरुसेवक,
(पू.) श्री. पृथ्वीराज हजारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२०)

पू. पृथ्वीराज हजारे यांचे कपडे धुण्याची सेवा करतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. भूषण कुलकर्णी

गेल्या २ मासांपासून भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने मला सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांचे कपडे धुण्याची सेवा मिळाली. ही सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. इतरांचा विचार करणे आणि नीटनेटकेपणा

१. पू. हजारेकाका यांचे कपडे धुण्याचे वार ठरलेले असून ते त्या ठरलेल्या दिवशी न विसरता कपडे धुण्यासाठी काढून ठेवतात, तसेच इस्त्री करण्यासही देतात.

२. पू. काका धुण्याचे कपडे व्यवस्थित घडी घालून एका पिशवीत नीटनेटकेपणाने भरून ठेवतात. ते पाहून मुळातच ते कपडे धुवायचे आहेत, असे दिसत नाही, तसेच ते कपडे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे मळलेलेही नसतात. या कपड्यांच्या समवेत ते न चुकता कपडे वाळत घालण्यासाठी आवश्यक त्या संख्येने हँगरही काढून ठेवतात.

१ आ. परेच्छेने वागणे आणि प्रीती : एका आठवड्यापासून माझ्यावर पंचकर्माचे उपचार चालू होते. त्या दिवशी मला पंचकर्म उपचारांसह दोन आश्रमसेवा आणि पू. हजारेकाकांसह अन्य एका संतांचे कपडे धुण्याची सेवा होती. त्यामुळे मी पू. हजारेकाकांना प्रार्थना करून विचारले, एक दिवसापुरते मला तुमचे कपडे परवाच्या ऐवजी उद्या धुण्यास मिळू शकतात का ? मला परवा पंचकर्मासह आश्रमसेवा आणि आणखी एका संतांचे कपडे धुण्याची सेवा आहे. त्यावर पू. काकांनी मला लगेचच होकार दिला आणि दुसर्‍या दिवशी न विसरता धुण्याचे कपडे काढून ठेवले. यातून त्यांची प्रीती आणि परेच्छेने वागणे अनुभवता आले.

२. आलेल्या अनुभूती

अ. पू. काकांचे कपडे धुतांना एक मंद सूक्ष्म सुगंध येतो, तसेच कपडे धुतांना त्या कपड्यांमध्ये पुष्कळ शक्ती जाणवते. या वेळी असे जाणवते की, मुळातच पू. काकांमध्ये पुष्कळ शक्ती आहे.

आ. गेल्या काही दिवसांपासून पू. काकांचे कपडे धुतांना माझ्या सप्तचक्रांवर परिणाम होत असून त्यामध्ये ऊर्जा कार्यरत होण्यासह त्यावर आलेले रजतमाचे आवरण नष्ट झाल्याचे जाणवते.

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१.२०२१)

पू. पृथ्वीराज हजारे यांचा काटकसरीपणा !

एकदा मी पू. हजारेभाई यांना धुलाई यंत्रात त्यांचे कपडे धुतांना पाहिले. त्या वेळी तेथे अंधार होता, तरीही त्यांनी दिवा लावला नव्हता. केवळ खिडकीतून येणार्‍या थोड्याशा उजेडात ते कपडे धूत होते. मी त्यांना विचारले, दिवा चालू करू का ? ते म्हणाले, नको. एवढा उजेड (खिडकीतून येणारा उजेड) पुरेसा आहे. या उदाहरणावरून संत किती काटकसरीने प्रत्येक कृती करतात, हे मला शिकायला मिळाले.

–  श्री. सुदीश पुथलत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०१८)