कोल्हापुरात होणार अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ वा वर्धापनदिन सोहळा

धर्मगुरूंचे सानिध्य, तसेच बांगलादेश आणि नेपाळ येथील महासंघाच्या पदाधिकार्‍यांची विशेष उपस्थिती

पुणे- अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या नववा वर्धापनदिन कोल्हापूर येथे ६ फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने वीरशैव समाजाच्या उत्कर्षासाठी वाहून घेतलेल्या अनेक मान्यवरांचा विशेष सत्कार, त्याचसमवेत विविध क्षेत्रांमध्ये स्वत:च्या कामाचा ठसा उमटवणार्‍या वीरशैव समाजातील १० मान्यवरांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती महासंघाचे प्रवक्ते डॉ. विजय जंगम स्वामी यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. महासंघाचे अध्यक्ष भिवलिंग जंगम, महासचिव अजित स्वामी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

कोल्हापूर येथे होत असलेल्या महासंघाच्या नवव्या वर्धापनदिनाचे यजमानपद अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेने स्वीकारले असून खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य गौडगांवकर, म्हाडाचे मराठवाडा सभापती (राज्यमंत्री दर्जा) संजयजी केणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. डॉ. विजय जंगम यांनी पुढे सांगितले की, जनगणनेचा अर्ज भरतांना धर्माच्या रकान्यात आपला धर्म हिंदु असल्याचेच नमूद करावे. हिंदु धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरणपद्धती आहे. त्यामुळे याकडे समाजबांधवांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे.

अक्कमहादेवी मंडप, बिंदूचौक कोल्हापूर येथे होत असलेल्या महासंघाच्या वर्धापनदिन सोहळ्याला महाराष्ट्र राज्यासह राजस्थान, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, देहली आदी भागांतून समाजबांधव उपस्थित रहाणार आहेत. त्याचसमवेत महासंघाच्या बांगलादेशातील चमूसह बांगलादेश संघटक पंकज रॉय, नेपाळमधील महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार असून त्या दृष्टीने सोहळ्याची जय्यत सिद्धता करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील अधिकाधिक समाजबांधवांनी महासंघाच्या या वर्धापनदिन सोहळ्याला उपस्थित राहून वीरशैव समाजासाठी ऐतिहासिक ठरणार्‍या या क्षणांचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन महासंघाच्या राज्यभरातील शाखांकडून करण्यात आले आहे.