पणजी, २७ जानेवारी (वार्ता.) – गेली कित्येक वर्षे अत्यंत खराब स्थितीत असलेला सांताक्रूझ ते ताळगाव रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी २६ जानेवारीला सांताक्रूझ आणि ताळगाव येथील ग्रामस्थांनी आल्तिनो, पणजी येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्या शासकीय निवासासमोर निदर्शने केली. त्यानंतर सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी पुढील आठवड्यात रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कित्येक वर्षे मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात स्थानिक आमदार आणि सार्वजनिक बांधकाम खाते अपयशी ठरले आहे. वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी ग्रामस्थांना याच रस्त्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जावे लागते. या आधी ४ जानेवारी २०२१ या दिवशी ग्रामस्थांनी पणजी येथील जुन्ता हाऊसमध्ये असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली होती. त्या वेळी तेथील अधिकार्यांनी हा रस्ता २१ दिवसांत दुरुस्त करू, असे आश्वासन दिले होते; परंतु काही किरकोळ दुरुस्तीशिवाय काहीही प्रगती झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी हे आंदोलन करण्याचे ठरवले. या रस्त्याचे काम ५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण न केल्यास स्थानिक आमदारांच्या घरासमोर निदर्शने चालू ठेवण्यात येतील, असे ग्रामस्थांनी सांगितले.