सोलापूर जिल्ह्यातील बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी रुपयांचा निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

अजित पवार

सोलापूर – जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांत झालेल्या अतीवृष्टीमुळे सिंमेंटच्या बंधार्‍यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे बंधार्‍यांचे बांध वाहून गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे हे बंधारे पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी राज्यशासनाकडून १३ कोटी १० लाख रुपयांचा निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. (अतीवृष्टीमुळे बंधारे वाहून जाणे हे अनाकलनीय आहे. यातून बंधार्‍यांचा दर्जा योग्य होता का अशीही शंका येते. याविषयीची चौकशी होणे आवश्यक आहे. – संपादक)

पुणे येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २५ जानेवारी या दिवशी जिल्ह्यातील नादुरुस्त बंधार्‍यांविषयी बैठक घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शहाजीबापू पाटील, प्रशांत परिचारक, जलसंपदाचे कार्यकारी संचालक टी.एन्. मुंडे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे उपस्थित होते.