दीप सिद्धू याच्याशी माझे संबंध नाहीत ! – भाजपचे खासदार सनी देओल यांचे स्पष्टीकरण

नवी देहली – लाल किल्ल्यावर जे घडले ते पाहून मन अतिशय दु:खी झाले. मी अगोदरही ६ डिसेंबर या दिवशी ट्वीट करून हे स्पष्ट केले आहे की, माझा किंवा माझ्या कुटुंबियांचा दीप सिद्धू याच्याशी कोणताही संबंध नाही, असे ट्वीट भाजपचे खासदार आणि अभिनेते सनी देओल यांनी केले आहे. प्रजासत्ताकदिनी देहलीत झालेल्या हिंसाचाराच्या वेळी शेतकर्‍यांना चिथावणी देण्याचा आणि आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू याच्यावर करण्यात येत आहे. वर्ष २०१९ मध्ये सनी देओल यांनी पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दीप सिद्धू हा सनी देओल यांचा प्रभारी म्हणून निवडणुकीत दिसत होता. सनी देओल यांचा एक जुना व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित हो आहे. यात ‘दीपला मी गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखत आहे. तो माझ्यासाठी छोट्या भावासारखा आहे’ असे सनी देओल म्हणतांना दिसत आहेत.


(सौजन्य : ABP NEWS)

(म्हणे) ‘लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावण्याच्या प्रकाराला धार्मिक रंग दिला जाऊ नये !’ – दीप सिद्धू

शेतकर्‍यांच्या या आंदोलनात खलिस्तानवाद्यांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे त्यातून हा प्रकार घडला नसेल कशावरून ?

शेतकरी आंदोलनकर्त्यांकडून लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावण्यात आला. त्या वेळी दीप सिद्धू घटनास्थळी उपस्थित होता. त्याने फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय ध्वज हटवलेला नाही, तर केवळ प्रतिकात्मक विरोध म्हणून ‘निशान साहिब’ फडकावला. ‘निशान साहिब’ हे शीख धर्माचे प्रतीक आहे. हा झेंडा सर्व गुरुद्वारा परिसरात आढळतो. देहलीत प्रजासत्ताकदिनी जे काही घडले ते योजनाबद्ध पद्धतीने घडलेले नाही आणि त्याला कोणताही धार्मिक रंग दिला जाऊ नये.