पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराजांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज

कुडाळ – पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा ३१ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्या येथील समाधी मंदिरात साजरा होणार आहे. शासनाचे कोरोनाविषयीचे नियम पाळून भाविकांनी या पुण्यतिथी सोहळ्याचा, तसेच धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांनी केले आहे.

प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज

३१ जानेवारी या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून काकड आरती, प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधीस्थानी अभिषेक आणि एकादशणी, प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांची पाद्यपूजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची महाआरती, १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, १ वाजता भावई प्रासादिक भजन मंडळ, कुणकेरी; दुपारी ४ वाजता प.पू. राऊळ महाराज भजन मंडळ, राऊळवाडी आणि सायंकाळी ५ वाजता प.पू. राऊळ महाराज महिला भजन मंडळ, राऊळवाडी यांच्या भजनांचे कार्यक्रम; सायंकाळी ७ वाजता श्रींची सांजआरती, प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधीस्थान ते प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज जन्मस्थानापर्यंत पालखी मिरवणूक सोहळा आणि रात्री ११ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्‍वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, असे कार्यक्रम होणार आहेत.

कोरोनाचे नियम पाळून साजरा होणार सोहळा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियम पाळून समाधीमंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणार्‍या भक्तांनी मास्क वापरावा, तसेच सामाजिक अंतर पाळावे. मंदिरात येणार्‍या भाविकांची ‘थर्मल’ चाचणी आणि निर्जंतुकीकरणाची (सॅनीटायझर) व्यवस्था श्री. महेश नामदेव धुरी, साळगांव यांनी केली आहे. समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट श्री. अजित आंगणे आणि सहकारी यांच्या सौजन्याने करण्यात येणार आहे.