गडचिरोली येथे विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू, तर ५० हून अधिक जणांना बाधा

दारूबंदी असलेल्या भागांत अशा प्रकारच्या घटना होणे हे कायद्याच्या पालनासाठी ज्यांनी जागरूक रहाणे प्रशासनाला जमत नसल्याचेच द्योतक आहे !

गडचिरोली – येथील ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान उमेदवाराने विषारी दारू पाजल्याने दोघांचा मृत्यू, तर ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे २० जानेवारी या दिवशी घडली. बाधा झालेल्या ३ जणांना चंद्रपूरच्या रुग्णालयात, तर एकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. (समाजाला नशेच्या आहारी पाडणार्‍यांना कडक शिक्षा करायला हवी. – संपादक)

गडचिरोली जिल्ह्यात १९९२ या वर्षापासून मद्यबंदी आहे. मद्यबंदी यशस्वी व्हावी, यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून प्रयत्न चालू आहेत, तसेच जिल्ह्यात मुक्तीपथ संघटनेकडून मद्यबंदीच्या कार्यवाहीसाठी जनजागृती करण्यात येते; मात्र त्यानंतरही जिल्ह्यात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध आणि बनावट मद्याचा पुरवठा होत असल्याचे या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.