पणजी – ‘सरफरोश २’ चित्रपट भारताच्या अंतर्गत सुरक्षेविषयी आहे. विविध समस्या असतांनादेखील भारताची अंतर्गत सुरक्षा किती भक्कम आहे, हे यातून दाखवले जाईल. या समस्या झेलणार्या ‘सीआरपीएफ्’च्या (केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या) सैनिकांना हा चित्रपट समर्पित करत आहे, असे प्रतिपादन ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरामा ज्युरी आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे लेखक, निर्माता अन् दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन यांनी केले. ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘डू यू हॅव इट?’ या शीर्षकांतर्गत आयोजित केलेल्या आभासी संवाद सत्रात ते सिनेपत्रकार फरदीन शहरीयार यांच्याशी संवाद साधत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘मी माझ्या चित्रपटाच्या आशयाच्या शोधात संपूर्ण भारत फिरलो आहे. कोणत्याही चित्रपट निर्मात्यासाठी सामाजिक आणि राजकीय सूत्रे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मला वाटते लेखक किंवा दिग्दर्शक यांनी समाजाप्रती संवेदनशील असले पाहिजे. कुणाच्याही भावना न दुखावता आपल्याला आपले सूत्र मांडता आले पाहिजे.’’
मॅथन यांना यापूर्वी ते निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या ‘सरफरोश’ (१९९९) या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा दोन्ही जॉन मॅथ्यू मॅथन यांनी लिहिली आहे.
चित्रपटातील गाणी ही त्या चित्रपटाच्या कथेला पूरक असली पाहिजेत. ज्या वेळी या चित्रपटाची निर्मिती केली, तेव्हा कमाईच्या दृष्टीने संगीत हा या चित्रपटाचा एक मोठा घटक होता. या चित्रपटात २ प्रेमगीते चित्रित करण्याची कल्पना मला आवडली नव्हती, असे मॅथन यांनी ‘सरफरोश’ चित्रपटाविषयी सांगितले. या संदर्भात ते म्हणाले की, एखाद्या चित्रपटात प्रेमगीते असण्यासाठी आता चित्रपट निर्मात्यावर सक्ती केली जात नाही, चित्रपटाच्या व्यवसायासाठी आता याची आवश्यकताही नाही.
भारतीय पॅनोरमाचे ज्युरी-अध्यक्ष म्हणून काम करतांना आलेल्या अनुभवाविषयी ते म्हणाले की, मी १८० चित्रपट पाहिले आणि माझ्या लक्षात आले की, आपण किती वैविध्यपूर्ण आहोत. ते पुढे म्हणाले, ‘‘भारत हा एक उत्साहपूर्ण सक्रीय लोकशाही असलेला देश आहे. हा एक प्रेमळ देश आहे.’’