पणजी, १८ जानेवारी (वार्ता.) सत्तरी तालुक्यात कसल्या जाणार्या भूमीची मालकी मिळत नाही. याविषयी सत्तरी तालुक्यात अस्वस्थता आहे. हा विषय केवळ शेळ मेळावली येथील आय.आय.टी. पुरता मर्यादित नाही. भूमीच्या मालकीसाठी सत्तरीत एक दिवस उठाव होणार आहे, असे विधान मेळावली येथील आयआयटी विरोधातील युवा आंदोलक श्री. विश्वेश परब यांनी केले. ‘भारत माता की जय’ संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘मेळावली वाचवा लोकशाही वाचवा’, या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक सभेत ते बोलत होते.
या वेळी संघटनेचे मुख्य संरक्षक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई, श्री परशुराम सेनेचे उपाध्यक्ष श्री. गजानन मुतकेकर, शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. जितेश कामत, प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाचे श्री. महेश म्हांब्रे, मोपा विमानतळ संघर्ष समितीचे श्री. उदय महाले, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष श्री. शिवानंद देसाई, सवेराच्या प्रमुख तारा केरकर, गोमंतक हिंदू प्रतिष्ठानचे सदस्य श्री. अंकित साळगावकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत, भारतमाता की जय संघटनेचे सरचिटणीस श्री. दत्ता पु. नाईक, कार्याध्यक्ष श्री. प्रवीण नेसवणकर आदी उपस्थित होते.
या वेळी परब म्हणाले, ‘‘भूमीच्या मालकीचा लढा फार पूर्वीपासूनचा आहे. तत्कालीन आमदार जयसिंगराव राणे यांनी लढा उभारला त्यात मधू दंडवतेही सहभागी झाले होते. आता त्या लढ्याने गती घेतली आहे. वर्ष २०१८ मध्ये बुद्रुक करमळी गावात सभा घेतली. नंतर करंझोळ येथे मोठी सभा झाली. त्यानंतर आमदारांकडून बैठक घेण्याचा प्रयत्न झाला.’’
मोपा विमानतळ संघर्ष समितीचे उदय महाले म्हणाले, ‘‘पोलिसांच्या बळाचा वापर करून मोपा विमानतळाच्या विरोधात आंदोलन करणार्यांचा आवाज दडपला जात आहे. यातून मोपाचे संरपंचही सुटलेले नाहीत. विमानतळाचे बांधकाम करणारे आस्थापन नोकरभरतीसाठी केरळमध्ये जाहिरात देते; मात्र स्थानिकांना संधी देत नाही. विमानतळ झाल्यावर रोजगार मिळेल याची कोणतीही शाश्वती नाही. पेडण्याच्या आवाजात जनतेने आपला आवाज बुलंद करावा आणि आम्हाला समर्थन द्यावे.’’
संघर्ष संपलेला नाही ! प्रा. सुभाष वेलिंगकर
या कार्यक्रमात प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले, ‘‘मेळावलीतील जागृती राज्यासाठी आदर्श ठरणार आहे. शासनाच्या दडपशाहीला त्यांनी यशस्वीरित्या तोंड दिले आहे. वर्ष २०१२ पासून शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. शासनाने गोवामुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षातही अन्याय अत्याचार चालू ठेवले आहेत. सज्जन आणि दुर्जन यांचा संघर्ष पूर्वीपासून चालू आहे, तो संपलेला नाही. स्वातंत्र्यापूर्वी तो परकियांविरुद्ध होता; पण आता आपल्याला स्वकियांशी युद्ध करावे लागत आहे. पोलीस जनतेच्या रक्षणासाठी असतात. त्या पोलिसांनी लोकांवर अन्याय केला, तर लोकांनी कुणाकडे पहावे.’’
पोलिसांनी महिलांवर केलेल्या अन्यायाचा निषेध ! सौ. शुभा सावंत
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत म्हणाल्या, ‘‘पोलिसांनी महिलांवर जो अन्याय केला, जी दडपशाही केली, त्याचा आम्ही निषेध करतो. घटनेने सर्वांना मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. असे असतांना महिलांवर त्या गुन्हेगार असल्याप्रमाणे कलमे लावण्यात आली हे खेदजनक आहे.’’
या कार्यक्रमात श्री. विश्वेश परब आणि श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांचा सत्कार करण्यात आला. श्री. प्रवीण गवाणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप पाळणी यांनी केले.