श्रीराममंदिरासाठी निधी समर्पण अभियानाला प्रारंभ !
नवी देहली – अयोध्येत उभारल्या जाणार्या श्रीराममंदिरासाठी निधी समर्पण अभियानाला १५ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला. या कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सर्वप्रथम ५ लाख १०० रुपयांचा निधी समर्पित करत या अभियानाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १ लाख रुपयांचे दान या निधीत जमा केले. कर्णावती येथील हिरे व्यापारी गोविंदभाई ढोढाकिया यांनी ११ कोटी रुपयांचे दान दिले. ते रा.स्व. संघाशी निगडित आहेत.
या अभियानामध्ये ५ लाखांहून अधिक गावांमध्ये १२ कोटींहून अधिक कुटुंबांशी संपर्क साधला जाणार आहे. ही दान समर्पण मोहीम येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या दरम्यान १० रुपये, १०० रुपये आणि १००० रुपयांचे कूपन दिले जातील, तर २ सहस्र रुपयांहून अधिक निधी देणार्या दात्यांना पावती दिली जाईल.