‘व्हॉट्सअ‍ॅप’ने माघार घेत अटी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला !

८ फेब्रुवारीला व्हॉट्सअ‍ॅप डिलीट होणार नाही !

नवी देहली – ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने ४ जानेवारीला त्याच्या नव्या सेवा अटी (टर्म ऑफ सर्व्हिस) घोषित करत त्याची कार्यवाही ८ फेब्रुवारीपासून करण्यात येणार असल्याचे घोषित केले होतेे. या सेवा अटी न स्वीकारणार्‍याचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ डिलीट होणार आहे, असे यात म्हटले होते. यास जगभरातून विरोध झाल्यानंतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने स्पष्टीकरण दिले; मात्र त्याला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे आता ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने माघार घेत या अटी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.

फेसबूकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की,

१. चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून त्यामुळे सेवा अटी अद्ययावत करण्याचा निर्णय आम्ही पुढे ढकलत आहे. अटींची समीक्षा करून त्या स्वीकारण्यासाठी जी तारीख देण्यात आली होती, ती आम्ही मागे घेत आहोत. ८ फेब्रुवारीला कुणाचेही व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद किंवा डिलीट होणार नाही. आम्ही चुकीची माहिती दूर करण्यासाठी आणखी प्रयत्न करणार असून गोपनीयता आणि सुरक्षा यांवर कशापद्धतीने काम करत आहे, यांविषयी सुस्पष्टता आणणार आहोत.

२. १५ मे या दिवशी व्यावसायिक पर्याय उपलब्ध करण्यापूर्वी नव्या अटींविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही हळूहळू लोकांपर्यंत पोचणार आहोत. व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांना या अटींची समीक्षा करण्यासाठी आणि त्या समजून घेण्यासाठी भरपूर वेळ मिळावा, हे आम्ही निश्‍चित करत आहोत. या अटींच्या आधारावर खाते डिलीट करण्याची वा बंद करण्याची आमची कोणतीही योजना नव्हती आणि भविष्यातही नसेल. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांनी निश्‍चिंत रहावे, असेही व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केले आहे.