राज्यपाल आणि आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ !

डावीकडून स्वामी अवधेशानंद गिरी महाराज आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

नागपूर – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी संपूर्ण देशात १५ जानेवारीपासून निधी संकलन मोहीम आखण्यात आली आहे. नागपूरसह विदर्भातील निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ १५ जानेवारी या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि हिंदु धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष जुनापीठाधीश्‍वर आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत येथील पोद्दारेश्‍वर राम मंदिर येथून होणार आहे.

या निमित्ताने १५ जानेवारी या दिवशी सकाळी ८ वाजता स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांचे विमानाने येथे आगमन होणार आहे. दुपारी ४ वाजता ते निधी समर्पण कार्यक्रमात बन्सल यांचे निवासस्थान, राम वाटिका, वर्धमाननगर येथे उपस्थित रहातील. सायंकाळी ५.३० वाजता निधी समर्पण, गृहसंपर्क अभियानाच्या निमित्ताने रामजी महाराज मठ, राऊत चौक, मस्कासाथ येथून आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज परिसरात गृहसंपर्क करत श्रीरामजन्मभूमी मंदिर उभारणीसाठी भिक्षा मागतील. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत निधी संकलन केले जाईल. निधी संकलन पावती पुस्तक आणि कुपन यांच्या माध्यमातून केले जाईल.