भंडारा रुग्णालयातील आगीचे प्रकरण
नागपूर – राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी ११ जानेवारी या दिवशी भंडारा येथील विश्रामगृहावर केलेल्या चिकन, मटण मांसाहार मेजवानीविषयी राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. जिल्हा रुग्णालयात ८ जानेवारी या दिवशी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १० बालकांचे जीव गेले होते. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणार्या या घटनेनंतर मंत्र्यांच्या ताफ्यातील कर्मचार्यांनी भंडारा भेटीच्या निमित्ताने रात्री मेजवानी केल्याविषयी ‘हा असंवेदनशीलतेचा कळस’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केली; मात्र हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच ‘या प्रकरणाशी आमचा संबंध नाही’, असे सांगून भंडारा येथील प्रशासकीय अधिकार्यांनी हात झटकले आहेत.
भंडारा येथील जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या प्रकरणी भाष्य करणे टाळले, तर आम्ही ‘मिक्स व्हेज, वांग्याचे भरीत, दाल तडका, भात, भाकरी आणि पोळ्या’, असे जेवण बनवायला सांगितले होते, असे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी स्पष्ट केले. असे असतांना ‘मटन, चिकन आणि झिंगे आणले कोणी ?’ असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एन्. नंदनवार यांनीही ‘आमचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही. आम्हाला यात उगाच गोवू नका’, असे सांगून हात वर केले.