जणू साधक सूर्यराशीत प्रवेश करणार !

श्री. सुमित सागवेकर

१३ जानेवारी २०२१ या दिवशी ध्यानाला बसलो असतांना दिसलेले सूक्ष्म चित्र आणि त्यानुरूप देवाने दिलेले विचार येथे लिहित आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा ‘पुनश्‍च शुभारंभ’ हा लेख १३ जानेवारीला प्रसिद्ध झाला. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अध्यात्मप्रसार आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला मोठ्या प्रतीक्षेनंतर प्रारंभ करणार आहेत. देशभरातील साधकांच्या मनात आनंदाच्या आणि चैतन्याच्या लहरी पसरल्या आहेत, तसेच सर्वत्र आनंद अन् सकारात्मकतेची स्पंदने जाणवत आहेत, दळणवळण बंदीच्या काळात साधक स्वतःची श्रद्धा बळकट करणारे आणि स्वतःतील गुरुभक्तीच्या चैतन्याने ओतप्रोत भारावलेले जीव आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनार्थ बाहेर पडणार आहेत. हे तेजस्वी जीव जे संपूर्ण सृष्टीला प्रकाशमान करणार आहेत. सर्वत्र प्रकाश दिसत आहे, प्रत्येक गुरुभक्त, शिष्य, साधक, कार्यकर्ता हा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत आहे. यातूनच पुढे संपूर्ण विश्‍वाला तेजोमयी करण्यासाठी सनातनचे साधक १४ जानेवारीला सूर्यराशीत प्रवेश करणार !

प्रत्येकामध्ये गुरूंच्या समष्टी रूपाशी एकरूप होण्यासाठीची व्याकुळता अनुभवायला येणे

​यापुढे हे जीव सूर्याप्रमाणे संपूर्ण विश्‍वाला चैतन्य प्रदान करून तिमिरावर विजय मिळवण्यासाठी निघाले आहेत, यांच्या भक्तीसागराला किनाराच नाही. अथांग भक्तीसागराप्रमाणे अखंड मोक्षाची वाट चालणारे जीव काही क्षण आत्मचिंतनासाठी विसावा घेत होते. हिंदु राष्ट्रासाठी तळमळीने कार्य करणारे सिंह काही दिवस सिंहावलोकनासाठी (अंतर्मनाच्या प्रक्रियेसाठी) गुरुचरणांशी चिंतन करत होते. श्रीगुरूंच्या समष्टी रूपाने या असंख्य जीवांना जणू आज संक्रांतीच्या निमित्ताने गवसणी घातली आहे, असेच वाटले. गुरुमाऊलीच्या या गवसणीला साद घालण्यासाठी हे सहस्रो भक्त बेभान होऊन आज गुरूंच्या समष्टी रुपाला आलिंगन घालण्यासाठी निघत आहेत. असंख्य हृदयातून आज ‘जय गुरुदेव’चा जयघोष निनादत आहे. साधकांच्या डोळ्यांमध्ये श्रीगुरूंच्या कृतज्ञतेपोटी अश्रू दाटून आले. ते गुरुमाऊलीला शरण येत आहेत आणि हातात हात घालून असंख्य कोटी हृदयामध्ये हिंदु राष्ट्राचे बीज पेरण्यासाठी हे जीव आज निघाले आहेत. ‘न भूतो ना भविष्यती’ अशी घटना मी रामनाथी आश्रमाच्या ध्यानमंदिरात बसून पहात होतो. प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये गुरूंच्या समष्टी रूपाशी एकरूप होण्यासाठीची व्याकुळता मला अनुभवण्यास येत होती.

ही संक्रांत तर पुनश्‍च शुभारंभाचा पाडवा !

​सर्वत्र पिवळा चैतन्याचा प्रकाश आणि असंख्य सोनेरी किरणांनी संपूर्ण सृष्टी उजळून निघाली आहे. खरंच आज बाहेर पडलेला प्रत्येक जीव सूर्यासमान आहे. असंख्य सूर्य ज्यामध्ये सामावले आहेत, ज्यांच्या तेजाने या असंख्य सूर्यांची निर्मिती झाली आहे, ते ब्रह्मांडनायक आज संपूर्ण सृष्टीचे भाग्यविधाते ठरले आहेत. समर्थासाठी शिष्य समर्थ (बोधचित्रातील समर्थ) होण्यास निघाला, परिसाने निर्माण केलेले सुवर्ण आज विश्‍वसुवर्ण करण्यास निघाले, हृदयाला हृदय भिडवून आज हिंदु राष्ट्राची मशाल घेऊन निघालेले सारे जीव गुरूंच्या समष्टी रूपाशी एकरूप होत आहेत. भूतकाळ दिसेनासा झाला आणि ध्येय समोर दिसायला लागले. हिंदु राष्ट्राच्या क्रांतीसूर्याप्रमाणे तेजोमय झालेले हे जीव आज निघणार, ही इतिहासातील एक अभूतपूर्व घटना आहे, असे आतून वाटत आहे. निसर्ग या हिंदु राष्ट्रविरांच्या स्वागतासाठी आतुर झाला आहे. ‘श्रीगुरुकृपेचा गोडवा, ही संक्रांत तर पुनश्‍च शुभारंभाचा पाडवा’, असेच म्हणावे लागेल. कृतार्थ झालेले जीव गुरुचरणाशी एकच मागणे मागतात…

पसरोनिया हात मागितो, कृपा माऊली ।

जोडोनिया हात जाहलो, कृतार्थ तवचरणी ।

काय वर्णू महिमा जगती, तुझा गुरुमाऊली ।

ब्रह्मांडाचा नायक तूची, असे कृपासावली ।

तूच पिता बंधु सखा, तूच माऊली ।

आलो शरण तुझिया आता, कृतज्ञता आमुची ॥

– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (१३.०१.२०२१)