शाकंभरी नवरात्रोत्सवात मोजके सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत होणार धार्मिक विधी

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेस १३ जानेवारी या दिवशी सायंकाळी प्रारंभ झाला. आठ दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर २१ जानेवारीच्या पहाटे श्री तुळजाभवानीदेवी सिंहासनावर विराजमान होईल. त्यानंतर दुपारी घटस्थापनेने शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. या वर्षी प्रथमच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जलयात्रा प्रातिनिधिक स्वरूपात वाहनातून काढण्यात येणार आहे.

कोरोनामुळे मोजकेच सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी परंपरेप्रमाणे पार पाडण्यात येणार आहेत. शाकंभरी नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण जलयात्रा २५ जानेवारी या दिवशी निघणार आहे. या वेळी मोजक्याच सुवासिनी पापनाश तीर्थ येथील इंद्रायणी कुंडातील पवित्र जल वाहनातून आणून श्री तुळजाभवानीदेवीच्या चरणावर वहाणार आहेत.