उच्च शिक्षण विभागाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठास नोटीस

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने त्यांच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयामध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ११ जानेवारीपासून चालू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाची अनुमती न घेता घेतला असल्याने त्याचा जाब उच्च शिक्षण विभागाने विद्यापिठास विचारल्यानंतर या निर्णयास स्थगिती दिली असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. एन्. एस्. उमराणी यांनी दिली आहे.

याविषयी माहिती अशी की, करोनाचा प्रादुर्भाव अल्प होत असल्याने, तसेच विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांनी पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयात नियमित वर्ग चालू करता येतील कि नाही, याविषयी आढावा घेण्यासाठी विद्यापिठाने प्राचार्य डॉ. व्ही. बी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या समितीने हा परस्पर निर्णय घेतला होता. यावरून उच्च शिक्षण संचालकांनी विद्यापिठास फटकारले आहे. शासनाने कोणतेही आदेश दिले नसतांना कोणत्या नियमाच्या आधारे हा निर्णय घेतला, याचा खुलासा मागितला आहे. या संबंधीचे पत्र उच्च शिक्षण संचालनालयाने विद्यापिठास पाठवले.