पणजी, ८ जानेवारी (वार्ता.) – शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा गोवा सुरक्षा मंचकडून ‘गोवा शासनाने या आंदोलकांविरुद्ध केलेली कृती अन्यायकारक आणि लोकशाहीविरोधी आहे’, या शब्दांत निषेध करण्यात आला आहे.
यासंबंधी गोवा सुरक्षा मंचने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘‘शेळ-मेळावली येथील प्रश्न सामाजिक आहे. नियोजित आय.आय.टी. प्रकल्पामुळे येथील अनेक शेतकर्यांवर परिणाम होत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. गोवा शासन पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे असलेले आणि लोकशाही मार्गाने चाललेले हे आंदोलन पोलिसांकडून कारवाई करून दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, तरी संबंधित शासकीय अधिकार्यांनी आणि व्यक्तींनी या आंदोलकांवर प्रविष्ट करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका करावी.’’
येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी शेळ- मेळावली प्रकरणी राज्य सरकार केंद्र सरकारच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्थानिक जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
शैलेंद्र वेलिंगकर यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांकडून मारहाण ! – सुभाष वेलिंगकर यांचा आरोप
मेळावली येथे जे आंदोलन झाले, त्याला माझा मुलगा शैलेंद्र वेलिंगकर यांनी पाठिंबा दिला. ७ जानेवारीला गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सावंत आमच्या घरी येऊन शैलेंद्रला चौकशीसाठी घेऊन गेले आणि तेथे गेल्यावर त्याला अटक करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक शोबित सक्सेना यांनी त्याला मारहाण केली. ८ जानेवारीला लक्षात आले की, त्याचा कान सुजला असून त्याला ऐकू येत नाही. आम्ही येथील सत्र न्यायालयात त्वरित जामिनासाठी धाव घेतली आणि न्यायाधिशांना अधीक्षक सक्सेना यांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यावर न्यायाधिशांनी वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला; पण शैलेंद्रला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी न नेता जिल्हा रुग्णालयात नेले. हे एक षड्यंत्र आहे, असे आम्हाला वाटते. त्याच्या जिवाला काही झाल्यास कोण उत्तरदायी ? त्यामुळे त्याची गोमेकॉत तपासणी करावी आणि मला त्वरित अहवाल द्यावा, अशी मागणी आहे.