‘भारतमाता की जय’ संघाच्या वतीने पत्रादेवी हुतात्मा स्मारकास गोवामुक्ती-६० निमित्त मानवंदना !
पणजी, २५ डिसेंबर (पत्रक) – पोर्तुगीज राजवटीच्या सर्व खुणा हटवून इथले वाडे, वस्त्या, रस्ते, गावे आणि शहरे यांची पोर्तुगीज नावे पालटून अन् पोर्तुगिजांचे कार्निव्हालसारखे उत्सव रहित केल्यासच खर्या अर्थाने गोवामुक्ती ठरणार आहे.
सर्व सरकारे गोव्याची स्वातंत्र्याकांक्षा पल्लवित करण्यात अपयशी ठरली आहेत. हे काम आता युवा पिढीने हाती घेणे अपरिहार्य ठरले आहे. हे आता आम्हा स्वाभिमान न गमावलेल्यांनी पूर्ण करावयाचे आव्हान आहे, असे उद्गार ‘भारतमाता की जय’ संघाचे राज्य संरक्षक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी उत्तर गोवा ‘भारतमाता की जय’च्या वतीने पत्रादेवी हुतात्मा स्मारकास गोवामुक्ती-६० उपक्रमानिमित्त मानवंदना देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी काढले.
‘भारतमाता की जय’चे राज्य कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण नेसवणकर यांनी पत्रादेवी हुतात्मा स्मारकास सर्वप्रथम हार अर्पण केला. त्यानंतर सर्व उपस्थितांनी स्मारकास पुष्पसमर्पण करून वंदन केले. याप्रसंगी राज्य घोषप्रमुख श्री. प्रकाश कुडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर गोव्याच्या घोषपथकाने वंशी, आनक आणि बिगुल यांच्या रचना वाजवून घोषवादनाने हुतात्म्याना मानवंदना दिली.
संघाचे राज्य सचिव श्री. गणेश गावडे यांनी प्रास्ताविक आणि परिचय केला. उत्तर गोवा कार्याध्यक्ष श्री. संतोष धारगळकर यांनी गोवामुक्तीचा संक्षिप्त इतिहास सांगितला. गोवा सुरक्षा मंचचे राज्य अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी पक्षाचे सर्व कार्यकर्ते गोवामुक्ती खर्या अर्थाने सार्थ करण्यासाठी कटीबद्ध आहेत, असे आश्वस्त करून वास्को शहराला भ्रष्ट करणारे समुद्री दरोडेखोर वास्को द गामाचे नाव हटवून गोव्याला मुक्ती देणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, असे सांगितले.
शेवटी तिरंगा ध्वजावतरण घोषाच्या निनादात करण्यात आले. ‘भारतमाता की जय’च्या ‘अस्मिता जागरण’ आयाम विभागाच्या वतीने सकाळी दक्षिण गोव्यात कुंकळ्ळी हुतात्मास्मारक अभिवादनाने चालू झालेल्या गोवामुक्ती-६० उपक्रमाची सांगता सायंकाळी ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ या प्रार्थनेने पत्रादेवी येथे झाली.