तत्त्वज्ञानाचे सार – गीता

सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः।
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥

(संदर्भ : अज्ञात)

अन्वयार्थ : सर्वोपनिषदः – सर्व उपनिषदे; गावः – गायी; गोपालनन्दनः – श्रीकृष्ण; दोग्धा – धार काढणारा; पार्थः – कुंतीपुत्र अर्जुन; वत्सः – वासरू; भोक्ता – (दूध) पिणारा; सुधीः – शुद्ध अंतःकरणाचा मनुष्य; गीतामृतम् – गीतारूप अमृत; महत् – उत्तम; दुग्धम् – दूध होय.

अर्थ : सर्व उपनिषदे या गायी असून त्यांची धार काढणारा गोपालनंदन श्रीकृष्ण आहे. या गायींसाठी अर्जुन वासरू असून गीतारूपी अमृत हे जणू उत्तम दूध आहे. या दुधाचा उपभोग घेणारे शुद्ध अंतःकरणाचे तत्त्वजिज्ञासू होत.

बोधार्थ : गीता हे सर्व उपनिषदांचे सार आहे. जे ज्ञान आणि ईश्‍वरप्राप्तीची जी जी साधने उपनिषदांनी सांगितली आहेत, ती अत्यंत सुलभतेने भगवान श्रीकृष्णाने सरळ अंतःकरणाच्या साधकांना साररूपात उपलब्ध करून दिली आहेत.’

– श्री. वि.गो. देसाई (गीता मंदिर पत्रिका, डिसेंबर २००२)