सांगवे येथील रास्त भाव धान्य दुकानातील धान्याचा काळा बाजार स्थानिकांच्या सतर्कतेमुळे उघड !

संशयित दोघांना अटक आणि सुटका

  • रास्त भाव धान्य दुकानांमध्ये अशा प्रकारे काळा बाजार होत असल्याची ही काही पहिली घटना नाही ! प्रशासन नेहमीच थातुरमातुर कारवाई करून गुन्हेगारांना सोडून देते ! त्यामुळेच अशा घटना वारंवार होतात !
  • आता हा प्रकार उघड झाला आहे ! यापूर्वी किती प्रमाणात काळा बाजार केला, हे शोधून सर्व पैसे वसूल करणे आवश्यक !

कणकवली – तालुक्यातील सांगवे येथील रास्त भाव धान्य दुकानातील धान्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचा डाव स्थानिकांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. या प्रकरणी दुकानाची तपासणी केली असता साठ्यात तफावत आढळून आल्याने पुरवठा निरीक्षक नितीन शंकरदास डाके यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी सेल्समन सुनील हरि तोरस्कर आणि वाहनचालक सुमित देवानंद मयेकर या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. यातील मयेकर याला ९ डिसेंबरला, तर सोरस्कर याला ११ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. या दोघांचीही न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.

सांगवे येथील दुकानातील धान्य टेम्पोतून अन्यत्र घेऊन जात असतांना ८ डिसेंबरला काही ग्रामस्थांनी संशयितांना पकडले होते. त्यानंतर तातडीने महसूल आणि पुरवठा विभागाला कळवण्यात आले. त्या वेळी पुरवठा अधिकारी नितीन डाके, मंडळ अधिकारी डी.एम्. पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर चौकशी करून रास्त दराच्या धान्य दुकानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत धान्य साठ्यात अनियमितता आढळून आली. त्यामुळे डाके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, ८ डिसेंबर २०२० या दिवशी सेल्समन सुनील हरि तोरस्कर याच्या कह्यातील सांगवे येथील रास्त भाव धान्य दुकानातील अंदाजे ५१ सहस्र ६४४ किमतीच्या धान्य साठ्यात भेद आढळून आला, तसेच वाहन क्रमांक एम्.एच्.०७-ए.जे. १६४६ या टेम्पोत धान्य आढळून आले. पोलिसांनी ८२ सहस्र रुपयांची २४.८५ क्विंटल तांदूळ असलेली ५१ पोती पंचनामा करून कह्यात घेतली आहेत.