जिल्हा पंचायत निवडणुकीवर स्थगिती आणण्यास न्यायालयाचा नकार

पणजी, ८ डिसेंबर (वार्ता.) – १२ डिसेंबर या दिवशी होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीवर स्थगिती आणण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नकार दर्शवला आहे. जिल्हा पंचायत निवडणूक जुन्या अधिसूचनेनुसार घेतल्या जात असल्याने निवडणुकीवर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी न्यायालयात प्रविष्ट केली होती.

मार्च २०२० मध्ये जिल्हा पंचायत निवडणूक होणार होती आणि त्या वेळी निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली होती. कोरोना महामारीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती आणि आता या निवडणुका १२ डिसेंबर या दिवशी होणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी याचिकेत म्हटले होते की निवडणुकीसाठी नव्याने आचारसंहिता लागू करणे आवश्यक आहे.

दक्षिण गोव्यात वयोवृद्ध नागरिक जि.पं. निवडणुकीत मतदान करण्यास इच्छुक नाही

मडगाव – कोरोना महामारीमुळे दक्षिण गोव्यात व्याधींनी त्रस्त असलेले अनेक वयोवृद्ध नागरिक जिल्हा पंचायतीसाठी मतदान करण्यास इच्छुक नाहीत. राज्यात कोरोना महामारीचा फटका सर्वाधिक व्याधींनी त्रस्त असलेल्या वयोवृद्ध नागरिकांना बसला आहे. तसेच अनेक मतदारांना जिल्हा पंचायत ही कोणतेही अधिकार नसलेली स्वायत्त संस्था, असे वाटत असल्याने त्यांना मतदान करण्यामध्ये रस नाही.

याविषयी काही ज्येष्ठ नागरिकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, ‘‘गोव्यात आतापर्यंत कोरोनामुळे ७०१ जणांचे निधन झाले आहे आणि यामध्ये वयोवृद्ध आणि आजारी असलेले लोक सर्वाधिक आहेत. मतदानासाठी जाण्यापूर्वी आम्हाला २ वेळा विचार करावा लागतो. आम्ही धोका पत्कारायच्या सिद्धतेत नाही. मतदान केंद्रांमध्ये कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी कोणत्या स्वरूपाची दक्षता घेतली आहे, याची आम्हाला कल्पना नाही. त्यामुळे मतदानापासून दूर रहाणेच योग्य वाटते.’’

जि.पं. निवडणुकीसाठी २४ घंटे कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षाची स्थापना

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी २४ घंटे कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पंचायत निवडणूक अधिकारी (उत्तर गोवा) या ठिकाणी हे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. निवडणुकीला अनुसरून कोणालाही तक्रार प्रविष्ट करायची असल्यास त्यांनी (०८३२) २२२५०८३ वर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

११ डिसेंबरपासून मद्यविक्रीची दुकाने बंद

जिल्हा पंचायत निवडणुकीमुळे राज्यातील मद्यविक्रीची दुकाने ११ डिसेंबरपासून १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आणि १३ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.