मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळात फेरपालट करावा ! – मायकल लोबो

ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो

पणजी, १ डिसेंबर (वार्ता.)  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रीमंडळात फेरपालट करून अकार्यक्षम व्यक्तींऐवजी कार्यक्षम व्यक्तींना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी बंदर आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी केली आहे.

ते म्हणाले, ‘‘मी मंत्रीमंडळात फेरपालट करण्याविषयी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.  वर्ष २०२२ मध्ये गोव्यात विधानसभा निवडणुका असल्याने मंत्रीमंडळात पालट आवश्यक आहे. आणखी एका वर्षानंतर विधानसभेची आचारसंहिता लागू केली जाईल. मंत्रीमंडळातून कुणाला काढून टाकावे, याविषयी मी काही म्हटलेले नाही, केवळ फेरपालट करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे कुणाला मंत्रीमंडळात ठेवायचे आणि कुणाला काढून टाकायचे, ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. जर मी अकार्यक्षम आहे, असे त्यांना वाटले, तर ते मलाही मंत्रीमंडळातून काढून टाकतील. सध्या मुख्यमंत्री मंत्र्यांच्या कार्याचा आढावा घेत आहेत. त्यांना राज्यासाठी काय आवश्यक आहे, ते ठाऊक आहे.’’