पैशांसह साड्यांची लाच मागणार्‍या सहकार अधिकार्‍यासह त्यांच्या मुलाला अटक

भ्रष्टाचार्‍यांची समाजात ‘छी थू’ व्हायला हवी !

मुंबई – सोसायटीच्या दुरुस्तीसाठी ‘सिंकिंग फंड’ (दुरुस्ती निधी) वापरता यावा म्हणून दोन लाख रुपयांसह दोन साड्यांची लाच मागणारे सहकार अधिकारी भरत काकड आणि त्यांचा मुलगा सचिन काकड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

मालाड येथील रोलेक्स अपार्टमेंटच्या अध्यक्षांनी सोसायटीच्या दुरुस्तीसाठी सोसायटीचा ‘सिंकिंग फंड’ वापरता यावा म्हणून सोसायटीच्या वतीने उपनिबंधक सहकारी संस्था, पी विभाग यांच्याकडे लेखी अर्ज दिला होता. यावर अनुमती देण्याकरता भरत काकड यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी सोसायटीचे सचिव यांना ‘डिफॉल्टर’ ठरवून कमिटी बरखास्त करण्याची नोटीस पाठवली.

तक्रारदाराने काकड यांच्याशी पुन्हा संपर्क साधल्यावर त्यांनी दोन लाख रुपये आणि दोन साड्यांची मागणी केली. पडताळणीत हे स्पष्ट होताच पोलिसांनी सापळा रचून त्यांचा मुलगा सचिन याला दोन लाख रुपये आणि दोन साड्या स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आली.