कुडाळ येथील राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याचे नियोजन करा ! – पालकमंत्री उदय सामंत

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करतांना कुडाळ तालुक्यामध्ये भूमीचा मोबदला देण्याची २३ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांचा प्रश्‍न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मार्गी लावण्यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी २८ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, कोकण विभागाच्या उपायुक्त यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्री सामंत यांनी अधिकार्‍यांना सांगितले की, ४ डिसेंबरला कुडाळ प्रांत कार्यालयामध्ये एका शिबिराचे (कॅम्पचे) आयोजन करावे. या शिबिरासाठी ज्या लोकांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत त्यांना निमंत्रण द्यावे, तसेच खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी यांनी उपस्थित रहावे. ठेकेदारासही या कॅम्पसाठी बोलवावे. या सर्व २३ लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन जागेवरच तात्काळ त्यांचे प्रश्‍न मार्गी लावावेत. हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत.

कुडाळ प्रांताधिकार्‍यांना दोषमुक्त केल्याची चौकशी करण्याच्या सूचना

कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने खरमाळे यांना दोषमुक्त ठरवल्याची, तसेच मुंबई-गोवा महामार्ग भूमी मोबदला वाटपाची संपूर्ण चौकशी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री सामंत यांनी दिल्या.

जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला मास्क आणि ‘सॅनिटायझर’ देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना

तज्ञांच्या समादेशानुसार कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबास सॅनिटायझर आणि जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास २ मास्क यांचे वाटप करायचे आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा विचार करून ही कारवाई लवकरात लवकर करावी, अशी सूचना पालकमंत्री सामंत यांनी दिली.

दिव्यांगांसाठी (विकलांगांसाठी) ५० लाख रुपयांची तरतूद करणार

जिल्हा परिषद ५ टक्के ‘सेस’ व्यतिरिक्त जिल्ह्यातील दिव्यांगांना (विकलांगांना) विविध प्रकारचे साहाय्य करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० लाख रुपये निधीची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दिव्यांगांना साहाय्यासाठीचे नियोजन करण्यात यावे, तसेच दिव्यांगासाठी असलेल्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री सामंत यांनी या वेळी दिल्या.