६० वा गोवा मुक्तीदिन मोठ्या स्वरूपात साजरा करण्यासाठी केंद्राकडे १०० कोटी रुपयांच्या साहाय्याची मागणी !

पणजी, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – गोवा राज्य ६० वा मुक्तीदिन वर्षभर मोठ्या स्वरूपात साजरा करणार आहे. १९ डिसेंबर २०२० पासून या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमांद्वारे गोवा आणि देशभर गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन सर्वांना घडवले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्राकडे १०० कोटी रुपये आर्थिक साहाय्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. वर्षभराचा कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये आमदार, व्यावसायिक, स्वातंत्र्यसैनिक, इतिहासतज्ञ आणि पत्रकार यांचा समावेश आहे. गोवा राज्य पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून १९ डिसेंबर १९६१ या दिवशी मुक्त झाला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘मुक्तीदिनाच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी केंद्राकडे १०० कोटी रुपये आर्थिक साहाय्याची मागणी करण्यात आली आहे आणि केंद्रशासन ही मागणी पूर्ण करणार, असा विश्‍वास आहे. या वर्षभराच्या कार्यक्रमात गोवा राज्याचा मुक्तीनंतरचा ६० वर्षांचा प्रवास, गोव्यातील कला आणि संस्कृती आदींविषयी माहिती देण्यात येणार आहे. याविषयी गोव्यासमवेतच इतर राज्यांतील राजधानींमध्ये ‘रोड शो’ केले जाणार आहेत. गोवा ‘स्वयंपूर्ण’ बनवण्यासाठी संबंधित घटकांशी वार्तालाप कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. या काळात गोवा मुक्तीलढ्यात सहभाग घेतलेले आणि सध्या हयात असलेले स्वातंत्र्यसैनिक, तसेच हयात नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना मरणोपरांत सन्मानित करण्यात येणार आहे. गोवा मुक्तीलढ्यात सहभाग घेतलेल्या गोव्याबाहेरील स्वातंत्र्यसैनिकांनाही त्यांच्या राज्यात जाऊन सन्मानित करण्यात येणार आहे.’’