घनकचर्‍यावर ‘बायोमायनिंग’ प्रक्रिया करणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला प्रकल्प मालवण येथे कार्यान्वित

मालवण – सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच घनकचर्‍यावर ‘बायोमायनिंग’ पद्धतीने प्रक्रिया करण्याचा मान मालवण नगरपालिकेला मिळाला आहे. शहरातील घनकचर्‍यावर ‘बायोमायनिंग’ पद्धतीने प्रक्रिया झाल्यास त्यातून चांगल्या प्रकारच्या खताचीही निर्मिती होणार आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या प्रक्रिया प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

या वेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बांधकाम सभापती यतीन खोत, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरि खोबरेकर, आरोग्य निरीक्षक विजय खरात आदी उपस्थित होते.

मालवण नगरपालिकेने शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. यातील महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजना लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. मालवणवासियांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आमदार वैभव नाईक यांनी या वेळी सांगितले.

‘बायोमायनिंग’ प्रक्रियेत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो. ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाते, तर सुक्या कचर्‍यातील प्रक्रिया होणारे पदार्थ वेगळे केले जातात. ज्या कचर्‍यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होऊ शकत नाही, त्याची विल्हेवाट लावली जाते.