डिचोली परिसरात नरकासुर प्रतिमांच्या सांगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा

जागरूक नागरिकांकडून नाराजी व्यक्त, रस्ता स्वच्छ करण्याची मागणी

जागरूक नागरिकांना दिसते ते पोलीस, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिसत नाही का ? खरेतर रस्त्यावर प्रतिमा जाळण्यावरच बंदी घालून ती कृती रोखायला हवी होती. प्रशासनात ते करण्याचे धाडस नाही, तर निदान दुसर्‍या दिवशी रस्ते तरी स्वच्छ करायचे होते ! नरकासुरवृत्ती जोपासणारे प्रशासन काय कामाचे ?

डिचोली, २० नोव्हेंबर (वार्ता.) – येथील परिसरात अनेक ठिकाणी नरकासुर प्रतिमांचे अर्धवट जळालेले अवशेष आणि राख अजूनही रस्त्यावरच असल्याचे आढळून येत आहे. काही ठिकाणी नरकासुर प्रतिमेसाठी वापरण्यात आलेले लोखंडी सांगाडे रस्त्यावर अस्ताव्यस्त पडून असल्याने विद्रूप चित्र दिसून येत आहे. हे अवशेष काढून रस्ते स्वच्छ करण्याकडे संबंधितांनी लक्ष न दिल्याने डिचोली येथील जागरूक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ‘हे अवशेष आता काढायचे कुणी ?’, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

दीपावलीच्या पहाटे डिचोली शहरासह बहुतेक ठिकाणी रस्त्यावरच नरकासुर प्रतिमांचे दहन करण्यात आले. बहुतेक ठिकाणी अर्धवट जळालेल्या प्रतिमांचे सांगाडे आणि राख तशीच पडून आहे. आज पर्यावरणाच्या रक्षणाविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती होत आहे, तसेच देशातही स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘नरकासुर प्रतिमा बनवणे मुळात आवश्यक आहे का ?’, याचा विचार करण्याची पाळी आता आली असल्याचा सूर जागरूक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. (जागरूक नागरिकांनी यापुढे संघटितपणे असे गैरप्रकार रोखण्यासाठी कृतीच्या स्तरावरील प्रयत्न करायला हवेत ! नागरिक संघटित नसल्यामुळेच नरकासुरी वृत्तीच्या लोकांचे फावते ! – संपादक)