सिंधुदुर्गातील माध्यमिक शिक्षण विभाग ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू करण्याच्या सिद्धतेत

सिंधुदुर्गनगरी, २० नोव्हेंबर (जि.मा.का.) – राज्यातील ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून चालू करण्यात येत आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाने सिद्धता चालू केली असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात येत आहेत. शाळा सुरक्षितपणे चालू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व शाळांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याविषयी कळवण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २४७ माध्यमिक शाळा असून सुमारे २ सहस्र २०० शिक्षक, ९०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच ९ वी ते १२ वीपर्यंतच्या वर्गांमध्ये ४२ सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोविड -१९ ची चाचणी करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड-१९ ची चाचणी शासकीय रुग्णालयामार्फत करण्यात येणार आहे. या चाचण्यांविषयीचे नियोजन जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. प्रामुख्याने ४० वर्षांवरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, तसेच मधुमेह, रक्तदाब, अस्थमा, गंभीर आजार यांसारखे आजार असतील, तर त्यांची आर्टीपीसीआर् टेस्ट करण्यात येणार आहे, तसेच इतर सर्व कर्मचार्‍यांची ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’ करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’ केलेल्यांची आर्टीपीसीआर् टेस्ट करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. प्राधान्याने शाळेतील मुख्याध्यापक, किमान एक शिक्षक यांची प्रथम चाचणी करण्यात येईल. टप्प्याटप्प्याने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची यानुसार चाचणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शाळा चालू करण्यापूर्वी आणि शाळा चालू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना सर्व शाळांना कळवण्यात आल्या आहेत.