सनातनच्या माध्यमातून साधना करणार्या काही साधकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. साधकांना होणारा वाईट शक्तींचा त्रास, हे सूक्ष्मातून चालणार्या देवासुर युद्धाचे लक्षण असते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगतांना ‘मी कौरवांना सूक्ष्मातून आधीच मारले आहे. तू केवळ निमित्तमात्र आहेस’, असे सांगितले होते. साधनेच्या बळावर सूक्ष्मातील युद्ध जिंकणे, म्हणजेच वाईट शक्तींना शक्तीहीन करणे आवश्यक आहे. नेमके हेच कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत. त्रास असणार्या साधकांचे त्रास दूर व्हावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्यासाठी किती कष्ट घेतात, याची काही उदाहरणे देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत.
१. त्रास असलेल्या साधकांना रात्री-बेरात्री उठूनही आधार देणे
‘वर्ष २००२ – २००३ मध्ये मिरज आश्रमातील काही साधकांना आध्यात्मिक त्रासांमुळे मानसिक त्रास व्हायचा. त्यामुळे ते अस्वस्थ असायचे. अशा साधकांना काही त्रास झाल्यास परात्पर गुरु डॉक्टर रात्री-बेरात्री उठून त्यांना आधार द्यायचे. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना उपाययोजना सांगायचे. ते स्वतः त्यांच्यासाठी नामजपही करायचे. काही जणांना तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, श्वास घेता न येणे आदी त्रास व्हायचे. त्या वेळी ते या साधकांसह बसून रात्रभर नामजप करायचे. ते सोबत असल्याने साधकांना नामजप करायला हुरूप येऊन त्यांचाही नामजप चांगला व्हायचा. त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक त्रास न्यून व्हायचा.’
– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०१६)
२. साधकांसाठी नामजप करतांना तहान-भूक विसरणे
‘साधकांना त्रास होण्यास आरंभ झाला, तेव्हा ते सतत एकाच सभागृहात पुष्कळ वेळ बसून आणि उभे राहून नामजपादी उपाय करायचे. सकाळचा अल्पाहार झाल्यावर रात्री झोपण्याच्या वेळेपर्यंत ते सतत नामजप करायचे. त्या वेळी स्वतःचे जेवण, विश्रांती, खाणे, पिणे यांकडेही त्यांचे लक्ष नसायचे. रात्रीही कुणाला त्रास झाल्यास तेव्हाही ते नामजप करायला यायचे, जेणेकरून या साधकांची त्रासातून मुक्तता होऊन ते लवकर बरे व्हावेत.
इतरांसाठी नामजप केल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांवरही वाईट शक्तींची आक्रमणे व्हायची. त्यांनाही त्रास व्हायचा; पण ते आम्हाला ते कळू देत नसत. साधकांवरच्या प्रीतीमुळेच ते एवढे त्रास सहन करूनही नामजपादी उपाय करत होते.’
– कु. गीता चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३. त्रास देणार्या वाईट शक्तींच्या असह्य वेदनांचा विचार करणारे करुणामय प.पू. डॉक्टर !
‘वर्ष २००२ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर ध्यान लावून वाईट शक्तींचा त्रास असणार्या साधकांसाठी नामजप करत होते. त्या वेळी एका साधिकेला त्रास देणारी वाईट शक्ती ‘मला रामबाण मारा’, असे वारंवार सूक्ष्मातून म्हणू लागली. ते ऐकून परात्पर गुरु डॉक्टरांनी डोळे उघडले आणि तिला उद्देशून म्हणाले, ‘सूक्ष्मातून रामबाण सोडला, तर तुला तो जोरात लागेल, तुला असह्य वेदना होतील. त्यापेक्षा तू प्रभु श्रीरामाचा नामजप करून साधिकेला त्रास देऊ नको. राम तुझे कल्याण करील.’ यातून त्यांच्या अंतःकरणातील वाईट शक्तींप्रतीची प्रीती पाहून माझे डोळे भरून आले.’
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०१३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक