अनुपम प्रीतीने सर्वांना ईश्‍वरप्राप्तीच्या समान धाग्यात गुंफणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनपेक्षित दर्शनाने आनंदलेले साधक

‘सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या कित्येक साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना एकदाही पाहिलेले नाही. असे असूनही ते सर्व परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली साधना अत्यंत श्रद्धापूर्वक करत आहेत. बाहेर मोहमायेचे प्रबळ जाळे असतांना केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेपोटी सनातनचे साधक सर्व मोह त्यागून ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करत आहेत. साम्यवाद, निधर्मीवाद, नास्तिकतावाद जोपासणे, हे समाजात प्रतिष्ठेचे झाले असतांना सनातनचे साधक स्वतः धर्मनिष्ठ राहून समाजालाही धर्माधिष्ठित होण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. यासाठी नास्तिक, पुरोगामी यांच्या विरोधाला सक्षमपणे सामोरे जायलाही ते सिद्ध आहेत. सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी मायेच्याच विश्‍वाचा एक घटक असलेल्यांना असे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी बळ कोण देते ?

सनातनच्या कठीण काळात समाजात वावरतांना, साधना-सेवा करत असतांना समाजाची टीका, परिचितांचे टोमणे, प्रसंगी घरातील सदस्यांचा वैचारिक विरोध सहन करूनही सनातन संस्थेेने सांगितलेल्या साधनेशी साधक एकनिष्ठ आहेत. साधना करत असल्यामुळे वातावरणातील वाईट शक्तींचे तीव्र त्रासही साधकांना भोगावे लागत आहेत. असह्य त्रास भोगूनही साधकांनी साधना करणे सोडलेले नाही. उलट त्रासातही साधक जोमाने साधना करत आहेत. हे सारे कशामुळे घडत आहे ? अशी कोणती शक्ती आहे, जी साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांशी जोडून ठेवते ? साधकांना साधनेशी जोडून ठेवणारी, कठीण काळात मनोबळ देणारी ती शक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांवर असलेली प्रीतीच आहे ! समष्टीप्रती उच्च प्रीती, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एक वैशिष्ट्य आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी समष्टी संतांच्या संदर्भात त्यांची प्रत्येक उक्ती, कृती, विचार यांतून समष्टी कल्याणाची तळमळ ओतप्रोत दिसून येते. समष्टीप्रती असलेल्या प्रीतीमुळे सर्वांना वात्सल्यमय कृपाछत्र अनुभवता येते. याच प्रीतीच्या चैतन्यमय धाग्याने आज सारा सनातन परिवार घट्ट बांधला गेला आहे. ७८ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समष्टीवरील प्रीतीचा अल्पसा परिचय वाचकांना करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. श्री गुरूंची महती वर्णन करण्यासाठी ईश्‍वरानेच बुद्धी आणि भक्ती प्रदान करावी, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !

ऑस्ट्रेलियास्थित ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे युरोपातील साधक श्री. देयान ग्लेश्‍चिच (युरोप) (आताचे पू. देयान) यांचे साधनेचे प्रयत्न ऐकल्यानंतर परात्पर गुरुदेवांना झालेला आनंद

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रीतीची व्यापकता

  • संघटनात्मक, प्रांतीय, धार्मिक बंधने नाहीत ! : परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रीतीला संघटनात्मक, प्रांतीय, धार्मिक अशी कोणतीच बंधने नाहीत. सनातनच्या साधकांची साधना चांगली व्हावी, यासाठी ते जेवढे प्रयत्न करतात, तेवढेच प्रयत्न अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी साधना करावी, यासाठी करतात. अडचणीत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांना आधार देण्याविषयी त्यांनी वेळोवेळी साधकांना सांगितले आहे. विदेशातून हिंदु धर्माविषयी जाणून घेण्यासाठी आलेल्या अहिंदू जिज्ञासूंच्या हिंदु धर्मविषयक शंकांचे त्यांनी घंटोनघंटे शंकानिरसन केलेले आहे.
  • विरोधकांविषयीही वैयक्तिक आकस नाही ! : सनातनला अनेकांनी अनेक मार्गांनी विरोध केला. या सर्व विरोधकांविषयीही त्यांच्या मनात कोणताही वैयक्तिक आकस नाही. ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणार्‍या साधकांना त्रास दिल्याचे मोठे पाप लागते. ते पाप त्या व्यक्तीला लागू नये, यासाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतून त्यांचा प्रतिवाद केला जातो. ‘त्याची चूक कळून त्याचे नैतिक अधःपतन टळावे’, ‘विरोधकांचीही हानी होऊ नये’, हा विचार ही त्यांची प्रीतीच आहे !
  • विकल्पांमुळे सोडून गेलेल्या साधकांविषयीही आपलेपणा : साधनेपासून दुरावलेल्या साधकांविषयी त्यांच्या मनात कधीच आकस निर्माण होत नाही. विकल्पांमुळे दुरावलेले साधक काही काळाने परत आल्यानंतरही परात्पर गुरु डॉक्टर त्यांना तितक्याच सहजतेने आपलेसे करतात.

१. परात्पर गुरूंच्या प्रीतीची वैशिष्ट्ये

१ अ. काही क्षणांच्या सहवासानेही समोरच्याला आपलेसे करणे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या केवळ एकदा संपर्कात आलेली व्यक्तीही त्यांचीच होऊन जाते, हे साधकांनीच अनुभवले आहे असे नाही, तर समाजातील धर्माभिमानी, अन्य संप्रदायांतील संत यांनीही अनुभवले आहे. जिज्ञासू, साधक, धर्माभिमानी यांना ते त्यांच्या सहवासात इतके प्रेम देतात, आपुलकीची वागणूक देतात की, आपण त्यांचे कधी होऊन गेलो, हे कळतच नाही. बाहेरचे काही संत आणि धर्माभिमानी यांनाही रामनाथी आश्रमात आल्यानंतर माहेरी आल्यासारखे वाटतेे. याचे कारण आश्रमात ठायी ठायी परात्पर गुरु डॉक्टरांनी रुजवलेली प्रीती आहे. खरेतर परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रीतीची स्पंदनेच संपूर्ण आश्रमात जाणवतात, जी बाहेरचे संत आणि धर्माभिमानी यांच्यात आश्रमाप्रती जवळीक निर्माण करतात.

१ आ. स्वतःप्रमाणेच प्रीती इतरांमध्ये रुजवणे

परात्पर गुरु डॉक्टरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्यातील प्रीती सनातनच्या सहस्रो साधकांमध्येही रुजवली आहे. आपल्या मूळ निवासापासून कित्येक किलोमीटर दूर जाऊन सेवा करणारे सनातनचे साधक आज अनोख्या कुटुंबभावनेने एकमेकांशी जोडले गेले आहेत. सध्याच्या काळात दोन सख्ख्या भावांचेही एकमेकांशी पटत नाही, अशा काळात सनातनच्या आश्रमांमध्ये शेकडो साधक गुण्या-गोविंदाने एकत्र रहात आहेत. याचे कारण परात्पर गुरु डॉक्टरांतील प्रीतीचा अंश त्यांनी साधकांमध्येही रुजवला आहे, हेच आहे. गेली अनेक वर्षे परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या रहात्या खोलीतून बाहेरही पडलेले नाहीत. अशा वेळी त्यांनी वेळोवेळी सांगितलेल्या साधनेतील सूत्रांच्या आधारे सनातनचे मार्गदर्शक साधक आणि संत सर्वत्रच्या साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत. या सर्व माध्यमांतूनही साधक परात्पर गुरु डॉक्टरांची प्रीतीच अनुभवत आहेत. त्यांच्या प्रीतीला स्थळ-काळाचे बंधन नाही.

परात्पर गुरु डॉक्टरांची जशी संत, साधक, धर्माभिमानी, समाज अशी सर्वांवर प्रीती आहे, तशाच प्रकारे आता साधकही समाजात प्रसार करत असतांना प्रेमभावाने सर्वांना आपलेसे करतात.

१ इ. स्वतःचे सर्वस्व साधकांसाठीच समर्पित असूनही साधकांना स्वतःत न अडकवता ईश्‍वरी तत्त्वाशी एकरूप होण्याची शिकवण देणे

समष्टी कल्याणाचे कार्य आरंभलेले असल्याने परात्पर गुरु डॉक्टरांवर वाईट शक्तींची अनेक आक्रमणे होत असतात. त्यांचा देह देवासुर युद्धाची युद्धभूमीच झाला आहे. स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही साधकांची सर्वतोपरी काळजी घेत असतांना आणि स्वतःचे सर्वस्व साधकांच्या कल्याणासाठीच पणाला लावलेले असतांनाही ते साधकांना ‘माझ्यात न अडकता कृष्णाकडे जा’, अशी शिकवण देतात. त्यांची साधकांवर प्रीती असली, तरी ‘साधकांनी मात्र तत्त्वाशी एकरूप व्हावे, सर्वव्यापी ईश्‍वराला भजावे’, अशी त्यांची शिकवण आहे. अर्थात् साधकांनाही ‘गुरुमाऊली प्राणाहूनही प्रिय आहे’, हे वेगळे सांगायला नको !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील प्रीतीमुळे दैवी बालके स्वतःहून आकर्षित होतात ! चि. न्योम सावंत (वय १० मास, मुंबई) स्वतः परात्पर गुरु डॉक्टरांकडे झेपावला, तेव्हा त्याच्या वडिलांनाही आश्‍चर्य वाटले !

२. प्रीतीला इतर वैशिष्ट्यांची सुंदर जोड

२ अ. साधकांच्या साधनेची हानी टाळण्यासाठी अवलंबलेली तत्त्वनिष्ठा

एखाद्या साधकाच्या स्वभावदोषांमुळे अथवा अहंमुळे त्याच्याकडून साधनेत चुका होत असतील आणि तो ईश्‍वरापासून दूर जात असेल, तर ते प्रसंगी कठोर होऊन स्वभावदोषांशी लढण्याची जाणीव करून देतात. एकाच प्रकारच्या चुका वारंवार होऊ लागल्यावर परात्पर गुरु डॉक्टर संबंधित साधकांना आश्रमातील फलकावर चूक लिहून प्रायश्‍चित्त घेण्यास सांगतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी दिलेला ‘फलक/प्रायश्‍चित्त’ हा निरोप तो दोष घालवण्यासाठी वरदानच ठरतो; कारण त्या चुकीच्या संदर्भात गांभीर्याने प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा तशी चूक होत नाही.

साधकाच्या साधनेची हानी टाळण्यासाठी प्रसंगी गुरूंनी बोललेले कठोर शब्द हीदेखील त्या साधकावरील गुरूंची प्रीतीच आहे. परात्पर गुरुदेवांनी सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून आज कित्येक साधकांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक अन् आनंदी झाला आहे.

२ आ. अखिल मानवजातीचे मूलभूत भले करण्याची तळमळ

मानवी जीवनात अनेक समस्या येतात. राष्ट्र आणि धर्म यांसमोरही सद्यःस्थितीत अनेक समस्या आहेत. असे असूनही एकेका समस्येवर कोणता उपाय योजावा, यासाठी वेळ न घालवता साधना केल्यानेच व्यक्तीचे मूलभूत भले होणार आहे, हे परात्पर गुरु डॉक्टर वारंवार मनावर बिंबवतात. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शन करण्यासाठी ते अखंड ग्रंथलिखाणाचे कार्य करत आहेत. प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही ते तशाही स्थितीत ग्रंथलिखाणाचे कार्य पूर्ण करण्याला प्राधान्य देतात. वास्तविक त्यांच्याएवढी उच्च आध्यात्मिक स्थिती प्राप्त झालेल्या अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना इतक्या कठीण स्थितीत सेवा करण्याची काय आवश्यकता आहे ? परंतु अखिल मानवजातीचे भले व्हावे, यासाठी ते अजूनही ग्रंथलिखाण करत आहेत. त्यांच्या या प्रीतीला उपमाच नाही !

या आणि यांसारख्या अनेक दैवी गुणवैशिष्ट्यांचा समुच्चय त्यांच्या ठायी आहे. या सार्‍या दैवी लक्षणांचे कोंदण त्यांच्या प्रीतीला आहे. त्यामुळेच त्यांना सर्व आपलेसे वाटतात आणि सर्वांना परात्पर गुरु डॉक्टर आपलेसे वाटतात. अशी ही गुरु-शिष्यांतील प्रीतीची अनोखी देवाण-घेवाण आहे. गेली अनेक वर्षे आम्ही साधक श्रीगुरूंच्या प्रीतीच्या सागरात आहोत. या सागरातील काही मोतीच येथे कथन करता आले. आमच्यावर शब्दांच्या पलीकडे कृपावर्षाव करणार्‍या श्रीगुरूंची महती शब्दांत वर्णन करण्यासाठी आमची वाणी असमर्थ आहे. त्यांच्या कृपाछत्राखाली साधना करून त्या प्रीतीच्या वर्षावाची अनुभूती घेणे, हेच त्यांना समजणे आहे !’

संकलक : कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०२०)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.