मुंबई – सहारा येथील एका गोदामामध्ये साठा करून ठेवण्यात आलेली मास्कची २०० खोकी पोलिसांनी पकडली आहेत. सहारा आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही एकत्रितपणे कारवाई केली. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी ‘या ठिकाणी ४ लाख मास्क कह्यात घेतले असून त्यांचे मूल्य एक कोटी रुपयांहून अधिक असावे’, असे म्हटले आहे.
या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. २ दिवसांपूर्वी गुन्हे अन्वेषण शाखेने विलेपार्ले आणि भिवंडी येथील गोदामांतून १४ कोटी रुपयांचा मास्कचा साठा कह्यात घेतला होता. ‘जीवनावश्यक वस्तूंचा साठा करू नका’, असे शासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत असूनही काही व्यावसायिक मास्कचा साठा करत आहेत.
याविषयी पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे म्हणाले की, हा साठा आखाती देशांत विकून आर्थिक लाभ कमावण्याचा साठेबाजांचा बेत होता. (मास्कची स्वस्तात विक्री न करता त्याचा साठा करून लाभ मिळवणार्या व्यापार्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. – संपादक) मास्क, सॅनेटायझर यांचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या वस्तूंची साठेबाजी गुन्हा ठरतो.