(म्हणे) ‘तंत्र-मंत्र, जप, धार्मिक प्रार्थना, पूजापाठ, होमहवन यांचे अवैज्ञानिक दावे लोकांच्या गळी उतरवण्यात येत आहेत !’

कोरोनाच्या आडून हिंदूंच्या धार्मिक विधींना अंधश्रद्धा ठरवण्याचा अंनिसचा नेहमीचाच कुटील डाव !

  • विज्ञानाला तरी असाध्य आजारांवर औषधे सापडली आहेत का ? या उलट श्रद्धा ठेवून आणि प्रार्थना करून घेतलेल्या औषधांनी रुग्ण अधिक वेगाने बरे झाल्याचे अनेक प्रयोग विदेशात यशस्वी होत आहेत.
  • कोरोनाने विश्‍वात आतापर्यंत कधी नव्हे एवढा हाहाःकार माजवला असूनही अंनिसवाल्यांचे डोळे उघडत नसतील, तर काय म्हणावे ?

मुंबई – देव-धर्म, अध्यात्म यांच्या नावाखाली कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूपासून सुटका करून घेण्यासाठी तंत्र-मंत्र, जपजाप्य, धार्मिक प्रार्थना, पूजापाठ, होम-हवन, पठण अशा विविध अवैज्ञानिक, दैवी उपायांचे खात्रीशीर दावे, छातीठोकपणे करून लोकांच्या गळी उतवण्यात ढोंगी मंडळी यशस्वी होतांना दिसत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रशांत पोतदार यांनी केले आहे. याविषयीचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. (स्वत:ला जेवढे कळते, तेवढेच सत्य मानणार्‍या अंनिसवाल्यांना विज्ञानवादी कसे म्हणता येईल ? खरा जिज्ञासू चिकित्सक असतो. प्रार्थना, पूजापाठ, होमहवन आदी हिंदूंच्या धार्मिक विधींमागे विज्ञानाच्यापेक्षाही मोठे बुद्धीपलीकडचे अधात्मशास्त्र आहे. अंनिसवाले खरेच चिकित्सक आणि स्वत:ला विज्ञानवादी म्हणवत असतील, त्यांनी या शास्त्राचा अभ्यास करावा. स्वत: नास्तिक असणार्‍यांनी हिंदु धर्मातील शास्त्राधार असलेल्या धार्मिक विधींना अवैज्ञानिक म्हणणे म्हणजे आंधळ्याने सृष्टीचे वर्णन करण्यासारखे आहे ! – संपादक)

अंनिसने म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना यांवर दैवी उपचार सांगणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. अशा भोंदूबाबांपासून लोकांनी सावधान रहावे. या भोंदूच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये. कोरोनाविषयी समाजमनात एक अदृश्य, अनामिक भीती निर्माण होणे साहजिक आहे. या भीतीचा स्वार्थासाठी उपयोग करून घेणारीही काही मंडळी आहेत. त्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर समाज या अंधश्रद्धांना बळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जोपर्यंत कोरोनावर खात्रीशीर वैद्यकीय उपाय, उपचार उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कोरोनाविषयीची भीती लोकांच्या मनात अल्प-अधिक रहाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी भोंदूबाबांपासून सजग रहावे. एक विवेकी कार्यकर्ता म्हणून अशा ढोंगी बाबांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असायला हवे. शोषणाचे असे प्रकार लक्षात येताच प्रशासनाला याची माहिती द्यावी. दैवी उपचार सांगणार्‍या आणि अफवा पसरवणार्‍या भोंदूगिरीविरोधात प्रबोधन करणे आवश्यक आहे. भोंदूबाबांच्या मागे लागू नये. (अंनिसला जर खरोखरच अंधश्रद्धेचे निर्मूलन करायचे असेल, तर त्यांनी समाजातील भोंदूगिरीच्या विरोधात लढा द्यावा; मात्र तसे न करता हिंदूंच्या सर्व धार्मिक विधींना अवैज्ञानिक ठरवून अंनिसचा हिंदु धर्माला संपवण्याचा डाव लक्षात येतो ! – संपादक)