तुकाराम मुंढेंच्या धडक कारभाराने यंत्रणा गतीमान !

महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात आणि जनतेत धडक अन् शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी ‘अन्न व औषध प्रशासना’चे (‘एफ्.डी.ए.’चे) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून पुन्हा एकदा त्यांच्या कामाचा धडाका दाखवून दिला आहे. मागील महिनाभरात त्यांनी राज्यभरात अन्न भेसळ करणार्‍यांवर ज्या तीव्र कारवाया केल्या आहेत, त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. अन्न भेसळीसारख्या थेट आरोग्याशी खेळणार्‍या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी अशा धडक कारभाराची आज महाराष्ट्राला आवश्यकता होती.

१. कठोर कायदेशीर कारवायांमुळे काळ्या बाजाराला आळा

अन्न व औषध प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट ‘नागिरकांना सकस, शुद्ध अन्न आणि सुरक्षित औषधे मिळवून देणे’, हे आहे; परंतु गेल्या काही वर्षांत सणासुदीच्या काळात किंवा नियमितपणे दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले आणि खवा यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे समोर आले होते. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच या टोळीवर थेट प्रहार केला. मागील महिनाभरात त्यांनी अचानक धाड टाकण्याची सत्रे चालू केली. बनावट (खोटे) दूध कारखाने, भेसळयुक्त पनीर आणि आरोग्याला घातक असणारे रंग वापरून बनवले जाणारे अन्नपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले. केवळ दंड ठोकून न थांबता, थेट गुन्हे नोंदवणे आणि परवाने (अनुज्ञप्ती) रहित करणे यांसारख्या कठोर कायदेशीर कारवायांमुळे अन्न भेसळीच्या काळ्या बाजाराला मोठा आळा बसला आहे.

२. अशा कारभाराने महाराष्ट्रात कशी सुधारणा होईल ?

श्री. नित्यानंद भिसे

तुकाराम मुंढे यांच्यासारखे विभागाचे प्रमुख जेव्हा स्वतः सक्रीय आणि प्रामाणिक असतात, तेव्हा संपूर्ण यंत्रणा गतीमान होते. भ्रष्ट अधिकार्‍यांना आळा बसतो आणि प्रामाणिक कर्मचार्‍यांना काम करण्याचे बळ मिळते. यामुळे ‘एफ्.डी.ए.’ची प्रतिमा अधिक विश्वासार्ह बनेल. भेसळयुक्त अन्नामुळे नागरिकांना कर्करोग, किडनीचे आजार आणि पोटाचे गंभीर विकार जडतात. मुंढे यांच्या कारवायांमुळे शुद्ध अन्न बाजारात उपलब्ध होईल, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यावर आणि जीवनमानावर होईल. ‘नियम सर्वांसाठी सारखेच’, हा मुंढे यांच्या कारभाराचा मुख्य मंत्र आहे. यामुळे मोठ्या राजकीय किंवा आर्थिक वजनाच्या भेसळखोरांनाही कायद्याचा धाक निर्माण होईल. व्यापारी वर्गात नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढेल.

३. इच्छाशक्ती असेल, तर एका रात्रीत पालट होऊ शकतो !

महाराष्ट्रात अन्न भेसळीचे जाळे अत्यंत खोलवर पसरले आहे. अनेकदा राजकीय वरदहस्त किंवा भ्रष्ट साखळीमुळे या माफियांचे मनोबल वाढलेले असते. अशा वेळी मवाळ धोरण काम करत नाही. तिथे तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कणखर, निर्भीड आणि तडजोड न करणार्‍या नेतृत्वाची आवश्यकता असते. ते कोणत्याही दबावाखाली न येता थेट जनतेच्या हिताचे निर्णय घेतात. सामान्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि शासकीय यंत्रणेवरील लोकांचा उडालेला विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी अशा धडक कारभाराची आज महाराष्ट्राला नितांत आवश्यकता आहे.

तुकाराम मुंढे यांच्या महिनाभरातील कारवायांनी हे सिद्ध केले आहे की, जर इच्छाशक्ती असेल, तर प्रशासनात आणि समाजात एका रात्रीत पालट घडवता येतो. अन्न भेसळमुक्तीच्या या मोहिमेमुळे महाराष्ट्राचे आरोग्य नक्कीच सुधारेल. हा धडाका असाच चालू राहिल्यास महाराष्ट्र हे अन्न सुरक्षेविषयी देशातील एक ‘आदर्श राज्य’ म्हणून समोर येईल.

– श्री. नित्यानंद भिसे, देवद, पनवेल.

(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’)