काशी-विश्वनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर सैनिकाच्या बंदुकीतून चुकून गोळ्या सुटल्या : ३ जण घायाळ

प्रतिकात्मक छायाचित्र

वाराणसी – काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ जवळ गर्दी नियंत्रित करत असतांना कर्तव्यावर असलेल्या प्रांतीय सशस्त्र दलातील सैनिकाच्या बंदुकीतून चुकून दोन गोळ्या सुटल्याने परिसरात काही काळ गोंधळ उडाला. गोळ्या रस्त्यावर लागल्याने उडालेल्या खडीमुळे मंदिराबाहेर हार-फुले विकणारे निक्की गुप्ता, रामबाबू आणि विकास यादव हे तिघे जण घायाळ झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

गोळ्यांचा आवाज ऐकताच सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धावले आणि भाविकांना हा अपघाती प्रकार असल्याचे सांगून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने गोळ्या थेट कुणालाही लागल्या नाहीत. घटनेचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण समोर आले असून त्यात सैनिकाच्या हातातील बंदुक हाताळतांना चुकून गोळ्या सुटल्याचे दिसत आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शिव हरी मीना यांनी सांगितले की, भाविकांची गर्दी नियंत्रित करत असतांना हा अपघात झाला असून संपूर्ण घटनेची चौकशी चालू आहे.