‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ

मुसलमानांशी संबंध येत असल्याविषयी आमदार सना मलिक यांचा त्रागा !

मुंबई, २३ जून (वार्ता.) – भाजपच्या नाशिक येथील आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी ‘राज्यातील तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रकरणी मुसलमान स्त्रियांवर होत असलेल्या अन्यायाप्रकरणी कठोर कारवाई व्हावी’, याविषयीची लक्षवेधी सूचना विधानसभेत उपस्थित केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदार सना नाईक म्हणाल्या, ‘‘तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व यांचा त्रास केवळ मुसलमान महिलांना होत नसून अन्य धर्मांतील महिलांनाही होत आहे.’’ यावर महायुतीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली, तर काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्या आमदारांनी सना मलिक यांच्या बोलण्याचे समर्थन करून त्यांना बोलण्याची संधी देण्याची मागणी केली. या वेळी सभागृहात गदारोळ निर्माण झाला.

१. लक्षवेधी सूचनेमध्ये आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी नाशिक येथील शबाना शबुद्दीन खान या महिलेला तलाक देण्यासाठी तिच्या नवर्‍याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले.

२. ‘पाकिस्तानसारख्या इस्लाम राष्ट्रात बहुपत्नीत्वावर निर्बंध असतांना भारतात असे प्रकार कसे चालतात ?’ असा प्रश्न उपस्थित केला. यावर सना मलिक यांनी म्हणाल्या, ‘‘पाकिस्तानने कुराणमध्ये जे सांगितले आहे, त्यानुसार कार्यवाही केली आहे. भारतामध्येही कुराणनुसार कार्यवाही करावी.’’

३. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले, ‘‘सभागृहात कुराणविषयी माहिती देण्याची आवश्यकता नाही. देश राज्यघटनेनुसार चालतो.’’ भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी ‘कुराणनुसार चालायचे असेल, तर पाकिस्तानात जा’, असे खडे बोल सुनावले.

तिहेरी तलाकविषयी नोंद झालेले गुन्हे मुसलमानांशी संबंधित !

वर्ष २०२४ मध्ये महाराष्ट्रात तिहेरी तलाक प्रकरणी ४२ गुन्हे नोंद झाले. या सर्व प्रकारांत सत्य आढळून आले. यांमध्ये १५२ जणांना अटक झाली. वर्ष २०२५ मध्ये तिहेरी तलाकचे ३९ गुन्हे नोंद होऊन या प्रकरणी ९५ जणांना अटक झाली. ‘तिहेरी तलाकचे गुन्हे अन्य धर्मांमध्ये झालेले नाहीत’, असे योगेश कदम यांनी नमूद करत नोंद झालेले गुन्हे मुसलमानांशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले.

महिलांवरील अत्याचारावरील कारवाईला धर्माशी जोडू नका ! – आमदार सुधीर मुनगंटीवार, भाजप

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्मांतील स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण दिली आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचारांवरील कारवाईला धर्माशी जोडू नका. महिलांवरील अत्याचाराला धर्माशी जोडण्याचे सना मलिक यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकावे. हिंदु धर्मातही महिलांवर अत्याचार होत असतील, तरी शिक्षा व्हायलाच हवी, असे नमूद करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सना मलिक यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

चर्चेच्या शेवटी गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, ‘‘आम्ही कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला सर्व धर्मांचा आदर करण्याची शिकवण दिली आहे.’’