गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी

मुंबई – गडचिरोली येथील ६ लोहखनिजाच्या खाणी ‘महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळा’ला द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनवण्याच्या उद्देशाने या खाणींची मागणी करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

‘राज्यशासनाला या खाणी मिळाल्यास २ वर्षांत त्या कार्यान्वित करून वर्ष २०३० पर्यंत उत्पादन चालू करू. भविष्यात स्टील उत्पादन निर्यातदार म्हणून भारताला पुढे आणू’, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. १८ जून या दिवशी वर्षा या निवासस्थानी त्यांची केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासमवेत ऑनलाईन बैठक झाली.

गडचिरोली भविष्यात महत्त्वाचे ‘पोलाद उत्पादक’ म्हणून विकसित होईल ! – मुख्यमंत्री 

गडचिरोलीमधील लोहखनिज देशातील सर्वाधिक दर्जेदार खनिजांपैकी एक आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. यातून ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येईल आणि लाखो रोजगार निर्माण होतील. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहखनिज साठे असून चुनखडीसह पोलाद उद्योगासाठी आवश्यक अन्य खनिजेही उपलब्ध आहेत. यासह कोळसा खाणी, मुबलक जलस्रोत आणि आवश्यक पायाभूत सुविधा आहेत. पोलाद उद्योगासाठी हा परिसर अत्यंत अनुकूल आहे.