बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवणार्‍या अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक

पेडणे, १८ जून (वार्ता.) – बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवल्याच्या प्रकरणी अफगाणिस्तानच्या एका नागरिकाला मोपा विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन विभागाच्या (इमिग्रशेन विभाग म्हणजे विमानतळावरील विदेशातून येणार्‍या किंवा बाहेर जाणार्‍या प्रवाशांची कागदपत्रे पडताळणारा विभाग) तक्रारीवरून ही अटक करण्यात आली आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार १६ जूनच्या उत्तररात्री २.१५ वाजण्याच्या सुमारास मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आगमन झाल्यावर इमिग्रेशन विभागाने केलेल्या पडताळणीच्या वेळी प्रिताश सिंह उपाख्य काशिश सिंह (वय २५ वर्षे) या अफगाणिस्तानच्या नागरिकाची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये त्याच्याकडे अफगाणिस्तानचे पारपत्र असून तो वैध प्रवासी कागदपत्रांविना भारतात आल्याचे उघड झाले. आरोपीने स्वतःची ओळख लपवून खोटी माहिती आणि बनावट कागदपत्रे सादर करून प्रितांश सिंह या नावाने भारतीय नागरिक असल्याचे भासवले, असे या चौकशीतून समोर आले आहे. तसेच या बनावट ओळखीचा वापर करून सरकारी यंत्रणांची फसवणूक करून झेड ए १८५५९६ क्रमांकाचे बनावट भारतीय पारपत्र मिळवल्याचे निष्पन्न झाले आहे.