क्रांतीदिनी हिंदु जनजागृती समितीने जुने गोवे येथील ‘हात कातरो खांबा’च्या ठिकाणी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली

पणजी, १८ जून – क्रांतीदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने जुने गोवे येथील‘हात कातरो खांबा’च्या ठिकाणी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. पोर्तुगीज राजवटीत गोमंतकीय हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराची आज (‘गोवा इन्क्विझिशन’ची) ‘हात कातरो खांब’ ही एकमेव साक्ष आहे. याप्रसंगी ‘श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती लढ्या’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शंकर वराडकर, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक, दीवाडी येथील सेंट अलुसियस हायस्कूल आणि श्री सरस्वती विद्यालय येथील प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ऐतिहासिक ‘हात कातरो खांबा’ला पुष्पहार अर्पण करून पोर्तुगीज आक्रमकांच्या विरोधात लढणार्‍या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या वेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक धरून देशप्रेम जागृत करणार्‍या घोषणा दिल्या. या वेळी ‘श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती लढ्या’चे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वश्री शंकर वराडकर म्हणाले, ‘‘आज आपली संस्कृती, परंपरा, मंदिरे आणि अस्मिता यांचे रक्षण करून वैचारिक गुलामगिरी नष्ट करणे, हाच या काळातील खरा संकल्प ठरणार आहे.’’

शिक्षक श्री. शिवाजी उजरेकर म्हणाले, ‘‘आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्ो आणि संस्कृतीचे रक्षण करणे, हेच आज आपले दायित्व आहे.’’ गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी म्हणाले, ‘‘आपले पूर्वज लढाऊ होते; म्हणूनच त्यांनी जुलमी राजवटीतही हिंदु संस्कृती टिकून ठेवली. सर्वांनी यातून प्रेरणा घ्यावी.’’ हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक म्हणाले, ‘‘हात कातरो खांब’ हा हिंदूंचा स्वाभिमान आणि बलीदान यांचे प्रतीक आहे. आज दुर्दैवाने ‘हात कातरो खांबा’चा इतिहास दडपून त्याचे नाव पालटण्याचा प्रयत्न होत आहे. स्वाभिमानी हिंदूंनी हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत.’’