‘आकाशवाणी पुणे’ विभागातील वृत्त विभाग बंद होणार ?

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांना ‘श्रमिक पत्रकार संघा’चे निवेदन

पुणे – ‘आकाशवाणी’ प्रसारण सेवेची ९० वर्षे पूर्ण होत असतांनाच पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी ‘भारतीय माहिती सेवा अधिकार्‍या’चे कायमस्वरूपी पद उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. या संदर्भात केंद्रीय नागरी विमान उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ‘श्रमिक पत्रकार संघा’ने निवेदन सादर केले.

सकाळच्या मराठी बातम्या, विश्वासार्ह वृत्तांकन, शुद्ध अभिजात (समृद्ध) मराठी भाषेच्या वापरामुळे या केंद्राने राज्यभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्ष २०१६ मध्ये येथील २ पदे अन्यत्र स्थलांतरित करण्यात आली. त्यानंतर या विभागाला २ वेळा बंद करण्याचा प्रयत्न केला. या विभागातील सध्याचे वृत्त अधिकारी मनोज क्षीरसागर हे ३० जून २०२६ या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर कोणताही कायमस्वरूपी वृत्त अधिकारी उपलब्ध होत नसल्याने कामकाज पहाणे कठीण होणार आहे. त्यामुळे हा विभाग इतरत्र स्थलांतरित करण्याची किंवा बंद करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रशासन याविषयी स्पष्टीकरण देणार का ? – संपादक)