मराठी शाळेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची घरपट्टी रहित !

कालगाव (कराड) – मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्यांची विद्यार्थीसंख्या वाढली पाहिजे आणि ग्रामीण भागांतील मातृभाषेतील शिक्षणाला बळ मिळाले पाहिजे. या उदात्त हेतूने मराठी शाळेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी रहित करण्याचा धोरणात्मक निर्णय कालगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये सरपंच सोमनाथ चव्हाण आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एकमताने हा ठराव संमत केला आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे मराठी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढेल, तसेच दिवसेंदिवस अल्प होत चाललेली विद्यार्थीसंख्या वाढण्यास साहाय्य होईल.

सध्या इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या आकर्षणामुळे अनेक मराठी शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षण वाचवण्यासाठी ग्रामपंचायतीने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. कालगाव ग्रामपंचायतीचा हा निर्णय दूरदृष्टी पूर्ण आणि प्रेरणादायी असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

संपादकीय भूमिका

मराठी शाळांची गुणवत्ता वाढवल्यास अशा प्रकारची प्रलोभने देण्याची वेळ येणार नाही !