आजपासून आर्.टी.ओ. कर्मचार्‍यांचा ‘बेमुदत संप’ !

प्रशासकीय अनास्थेचा परिणाम !

ए आय निर्मित चित्रमुंबई – न्याय्य मागण्यांसाठी वारंवार दाद मागूनही प्रशासन वेळकाढूपणाचे धोरण राबवत असल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील ‘आर्.टी.ओ.’ (मोटार वाहन विभाग) कर्मचार्‍यांनी १६ जूनपासून ‘बेमुदत संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे वाहन परवाने, वाहनांची नोंदणी आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र आदी महत्त्वाची कामे ठप्प होणार आहेत.

विभागाचा नवीन आकृतीबंध संमत होऊन साडेतीन वर्षे उलटली, तरी अद्याप सेवाप्रवेश नियम सिद्ध करण्यात आलेले नाहीत. नियमावलीच्या अभावामुळे अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. परिणामी त्यांची आर्थिक आणि सामाजिक हानी होत आहे. प्रशासकीय स्तरावर सुटण्यासारख्या प्रश्नांकडे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.

‘आम्ही प्रशासनाला पुरेसा वेळ दिला; परंतु आश्वासनांविना काहीही मिळाले नाही. आता बेमुदत संप हाच पर्याय उरला आहे. सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास कर्मचारी आंदोलनातून मागे हटणार नाहीत.’  – सुरेंद्र सरतापे, सरचिटणीस, आर्.टी.ओ. कर्मचारी संघटना