जनगणनेचे काम न केल्यास थेट फौजदारी गुन्हे नोंद करा !

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश

पुणे – जनगणनेचे काम १४ जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असतांना काही कर्मचारी या कामांकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा कर्मचार्‍यांची गय करणार नाही. राष्ट्रीय कर्तव्यात कसूर (चूक) केल्याप्रकरणी त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.

१. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ५ परिमंडळाच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांचे साहाय्यक आयुक्त यांची बैठक घेऊन जनगणना कामकाजाचा आढावा घेतला. ६० टक्के काम पूर्ण होऊन ४० टक्के काम अपूर्ण राहिल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.

२. नगर रस्ता, येरवडा-वाघोली, ढोले पाटील रस्ता, औंध-बाणेर आणि सिंहगड रस्ता या ५ कार्यालयांच्या हद्दीत ५० टक्केही काम पूर्ण झाले नसल्याची स्वीकृती अधिकार्‍यांनी दिली.

३. शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आदेश मिळूनही कामावर उपस्थित झाले नाहीत, अशा कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबित करण्याचे आयुक्तांनी सांगितले.

४. ‘ज्या शासकीय कार्यालय प्रमुखांनी अद्याप आपल्या कर्मचार्‍यांना जनगणना कामासाठी कार्यमुक्त केले नाही, त्यांना त्वरित कामासाठी मुक्त करावे’, अशी सूचनाही आयुक्तांनी केली.