बालिका अत्याचार प्रकरणात आरोपी कांबळे याच्यावर दोषारोप निश्चित !

आरोपी भीमराव कांबळे

पुणे – नसरापूर येथे ४ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणारे आरोपी भीमराव कांबळे याच्यावर दोषारोप निश्चित केला. आरोपीने हे दोषारोप नाकारले आहेत. या खटल्याची सुनावणी पुणे येथील विशेष न्यायालयात चालू झाली आहे. ही सुनावणी ‘इन कॅमेरा’ (बंद खोलीत) प्रतिदिन घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. विशेष न्यायालयात सुनावणीच्या पहिल्या दिवशी आरोपी भीमराव कांबळे याला पोलीस बंदोबस्तामध्ये उपस्थित केले. विशेष सरकारी अधिवक्ता अजय मिसर यांनी सविस्तर घटनाक्रम मांडत ‘ओपनिंग अ‍ॅड्रेस’चा (खटल्याच्या प्रारंभीचे दोन्ही बाजूंच्या अधिवक्त्यांनी न्यायाधिशांसमोर केलेले ‘प्रारंभिक भाषण’) युक्तीवाद केला.

आरोपी विरोधात भक्कम पुरावे आहेत. यामध्ये ‘सीसीटीव्ही चित्रीकरण (ज्यात आरोपी बालिकेला घेऊन जातांना दिसत आहे. ते दोघेजण शेवटचे एकत्र दिसले होते), प्रत्यक्षदर्शी बालक, ग्रामस्थांची साक्ष, वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) आणि डी.एन्.ए. अहवाल, मयताचा पंचनामा आणि आरोपीच्या सांगण्यावरून जप्त केलेला मुद्देमाल’ यांचा पुराव्यांमध्ये समावेश आहे, असे अधिवक्ता अजय मिसर यांनी सांगितले. त्यांनी ८२ साक्षीदारांची सूची न्यायालयात सादर केली.

‘अपहरण, विनयभंग आणि खुनासारखे गंभीर गुन्हे सिद्ध करण्यासाठी दोषारोपपत्रात पुरेसा आणि ठोस पुरावा नाही. ‘लास्ट सीन टुगेदर’ (पीडिता आरोपीसमवेत शेवटचे दिसणे) आणि न्यायवैद्यक पुरावे योग्य नसून आरोपींवर दोषारोप ठेवता येणार नाही’, असा दावा आरोपीचे अधिवक्ता हिंमतराव सूर्यवंशी यांनी केला आहे.