हिंदूंना मुसलमानांच्या सौहार्दाचे डोस पाजणार्‍या काँग्रेसच्या मंत्र्याचे झाले हसे !

  • उडुपी (कर्नाटक) येथील घटना

  • मुसलमान धर्म स्वीकारलेल्या मुलीने हिंदु आईला ‘शेजारीण’ असल्याचे सांगत साहाय्य करण्याची विनंती केल्यावरून मंत्र्याने केले होते कौतुक !

डावीकडे लक्ष्मी हेब्बाळकर

उडुपी (कर्नाटक) – स्वतःच्या सख्ख्या आईला ‘शेजारी रहाणारी महिला’ सांगून समाजाची दिशाभूल करणार्‍या हिजाबधारी तरुणीकडून आणि बुरखाधारी महिलेकडून भाजपला बंधुभाव शिकण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत भाजप महिला मोर्चाने जिल्ह्याच्या काँग्रेसच्या संपर्कमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर तीव्र टीका केली.

काय आहे प्रकरण ?

जिल्हा संपर्क मंत्र्यांकडे एका हिंदु महिलेला घेऊन आलेली हिजाबधारी तरुणी आणि बुरखाधारी महिला यांनी ‘आम्ही या हिंदु महिलेच्या शेजारी रहातो’, असे सांगितले आणि या गरीब महिलेला घरासाठी जागा देण्याची विनंती केली. या घटनेत मंत्र्यांना भेटण्यासाठी आणलेल्या गिरिजा शेट्टीगार या गरीब महिलेला मुसलमान धर्मात धर्मांतर केलेल्या त्यांच्या स्वतःच्या मुलीनेच तिथे आणले होते; मात्र मंत्र्यांसमोर तिने ‘मी या हिंदु महिलेची शेजारी आहे’, असे खोटे सांगून मंत्र्यांचीच दिशाभूल केली. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कोणताही सारासार विचार न करता माध्यमांसमोर उडुपीच्या भाजप नेत्यांना सौहार्दाचे भाषण ठोकले आणि स्वतःचे हसे करून घेतले.

उडुपी शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीता प्रभु यांनी म्हटले की, आतापर्यंत शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये हिजाब अन् बुरखा परिधान करून शैक्षणिक व्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणार्‍या या महिलांनी आता थेट जिल्हा संपर्क मंत्र्यांनाच फसवले आहे. केवळ प्रसिद्धीसाठी स्वतःच्या सख्ख्या आईला शेजारी रहाणारी महिला म्हणणार्‍या अशा लोकांच्या मानसिकतेचा समाजाने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.