‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे लातूर-पुण्यासह देशात भयंकर जाळे !

  • मुख्य सूत्रधारासह अनेक आधुनिक वैद्य आणि गर्भश्रीमंत पालक यांचा समावेश !

  • १० लाख रुपयांना विकल्या प्रश्नपत्रिका; कोट्यवधी रुपयांचा काळाबाजार उघड !

प्रा. पी.व्ही. कुलकर्णी

मुंबई – ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरसह पुणे, नांदेड, नाशिक, वाशिम, तसेच राजस्थानची राजधानी जयपूर, हरियाणातील गुरुग्राम या शहरांसह देशातील अनेक शहरांत पसरल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अन्वेषणात उघड झाले. संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार लातूर येथील दयानंद महाविद्यालयाचा रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक आणि पुण्याचा रहिवासी प्रा. पी.व्ही. कुलकर्णी असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेच्या अत्यंत गोपनीय अशा प्रश्नपत्रिका निर्मिती समितीमध्ये (‘पॅनेल’मध्ये) त्याचा समावेश होता. त्याने या पदाचा आणि गोपनीयतेचा गैरवापर केला. या प्रकरणी नाशिकचा शुभम खैरनार, गुरुग्रामचा यश यादव आणि जयपूरमधील मंगीलाल बिवाल, विकास बिवाल, तसेच दिनेश बिवाल यांना अटक करण्यात आली आहे.

पेपरफुटीचा घटनाक्रम असा…!

१. प्रा. कुलकर्णी याने पुण्यात त्याच्या निवासस्थानी अशासकीय आणि गुप्त वर्ग भरवले. तेथे निवडक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि पर्याय देऊन त्यांच्याकडून उत्तरे पाठ करून घेतली. ३ मे या दिवशीच्या परीक्षेत हेच प्रश्न आल्याने त्याचे बिंग फुटले.

२. टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप या माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांसह पालकांना ‘विनामूल्य चाचणी पत्रिका’ आणि अभ्यास साहित्याचे आमीष दाखवले. पालकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यातील श्रीमंत कुटुंबांना त्याने लक्ष्य केले.

३. एका पालकाने १० लाख रुपये देऊन प्रश्नपत्रिका विकत घेतली. पैसे वसूल करण्यासाठी त्या पालकाने ती प्रश्नपत्रिका इतर २ पालकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांना विकली.

४. परीक्षेच्या २ दिवस आधी लातूर आणि पुणे येथील आलिशान उपाहारगृहांतील गुप्त बैठकांमध्ये पालकांचे भ्रमणभाष जप्त करून त्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरे दाखवली.

५. या काळ्याबाजारात शिक्षकांसह दलाल, आधुनिक वैद्य आणि गर्भश्रीमंत पालक यांची मोठी साखळी कार्यरत होती.

६. मनीषा वाघमारे नावाच्या महिलेने श्रीमंत गिर्‍हाइके शोधली. आरोपींनी संपूर्ण पेपर एकत्र न देता विषयानुसार तुकड्या-तुकड्यांमध्ये फोडला.

७. वाशिममधील नामांकित आधुनिक वैद्य आणि नांदेडमधील गर्भश्रीमंत पालक यांनी चौकशीच्या भीतीने भ्रमणभाष बंद करून पलायन केले आहे.

संपादकीय भूमिका

  • समाजाची नीतीमत्ता ढासळल्याचे हे ढळढळीत उदाहरण ! भौतिक प्रगती आणि पैसा यांमुळे नीतीमत्ता हरवलेल्या शिक्षणक्षेत्रात असे घोटाळे होत आहेत. ‘परीक्षेत केवळ गुण मिळवणे म्हणजेच सर्वस्व’ या अवाजवी अट्टहासामुळे पालक आणि शिक्षक नैतिक मूल्यांना तिलांजली देत आहेत.
  • आता या गर्भश्रीमंतांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत आणि त्यांनी कितीही पैसे देऊ केले, तरी त्यांना जामीन नाकारला गेला पाहिजे, अशीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे !
  • असंख्य प्रामाणिक विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात; पण अशा अपप्रकारांमुळे त्यांची शैक्षणिक हानी होते. या हानीसाठी संबंधितांना उत्तरदायी ठरवण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे !