मुंबई महापालिकेकडून मासळी बाजारात मासे न कापता अख्खे मासे विकण्याची सक्ती !

  • स्वच्छता राखण्यासाठी निर्णय !

  • विरोधी पक्ष आणि मासेमार यांचा तीव्र विरोध !

मासळी बाजार

मुंबई – वाकोला (धोबीघाट) येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातली आहे. मासे कापल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि अस्वच्छता निर्माण होते, असे कारण प्रशासनाने दिले आहे. तर पालिका अधिकार्‍यांनी कोळी महिलांना आता बाजारात मासे कापून न देता, केवळ अख्खे मासे विकण्याची सक्ती केली आहे. या आदेशाचे पालन न केल्यास कारवाईची चेतावणी दिली आहे.

अनेक ग्राहक स्वच्छ केलेले मासे घेण्यास प्राधान्य देतात, त्यामुळे व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. मासळी बाजारात मासे कापण्यावर अचानक घालण्यात आलेल्या या बंदीच्या निर्णयामुळे मासे विक्रेत्यांमध्ये पुष्कळ अप्रसन्नता आहे. त्यांच्या विक्रीवर परिणाम होत असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

‘अशी कारवाई झाली असेल, तर योग्य नाही, आम्ही त्यात लक्ष घालू’, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर रितु तावडे यांनी दिली आहे. तर ‘आम्ही कसे काय खायचे, हे कोण ठरवणार ?’, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.