नागपूर येथे वरिष्ठांना सायबर गुन्ह्याविषयी खोटा अहवाल देणार्‍या ९ पोलिसांचे निलंबन !

नागपूर – कर्तव्यात कसूर करून वरिष्ठांना सायबर गुन्ह्याविषयी खोटा आणि दिशाभूल करणारा अहवाल देणारे ३ पोलीस अधिकारी आणि ६ कर्मचारी यांचे निलंबन नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी केले आहे. योगेश घारे, बळीराम सुतार आणि विजय राणे अशी पोलीस निरीक्षकांची नावे आहेत.

 १. नागपूरमधील ऑनलाईन बेटिंग अ‍ॅपद्वारे ५०० रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वात विशेष पथक पुणे आणि मुंबई येथे गेले.

२. पुण्यात पथकाने संशयित आरोपी एकांश जैन याची भेट घेऊन त्याला नोटीस दिली; मात्र नागपूरला परतल्यावर पथकाने ‘आरोपी मिळाला नाही’, असा खोटा अहवाल वरिष्ठांना सादर केला. अन्वेषणाच्या नावाखाली आरोपीकडून मोठी आर्थिक वसुली केल्याचीही चर्चा झाली.

३. ‘सायबर सेल’चे पोलीस हवालदार प्रफुल्ल ठाकरे यांना साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे यांनी मारहाण केल्यावर वरील प्रकार उघड झाला.

४. या प्रकरणानंतर ‘सायबर सेल’च्या पोलीस उपायुक्तांचे स्थानांतर करण्यात आले असून आय.पी.एस्. अधिकारी दीपक अग्रवाल यांच्याकडे सायबर विभागासह आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. ‘सायबर गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करणे आणि पीडित नागरिकांना न्याय मिळवून देणे’, हे प्राधान्य असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • रक्षकच भक्षक होऊ लागले, तर समाजात कायदा-सुव्यवस्था राखणार कोण ?
  • आरोपीच्या सुटकेसाठी प्रयत्न करणे, हे पोलिसांमधील नैतिक अध:पतन दर्शवते. अशा पोलिसांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !